‘ती’ गोष्ट खरी दाखवत मिळवले कोट्यावधीचे कर्ज; १३४ व्यक्तींचा नगर सहकारी बँकेला गंडा, वाचा काय घडला प्रकार

अहमदनगर :

‘इथेही झाले खोट्याचे खरे’ याचा प्रत्यय अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या राहाता तालुक्यातील एका शाखेला आला आहे. तब्बल १३४ लोकांनी खोटे दागिने बँकेत ठेऊन अडीच कोटी रुपयांच्या कर्ज मिळवले आहे. बनावट सोने गहाण ठेवल्या प्रकरणी या १३४ कर्जदार व सोनगाव शाखेचा सुवर्णपारखी (सराफ) यांच्यावर फसवणूकचा गुन्हा दाखल होणार आहे. बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी फौजदारी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे.

आजवर खोटे दागिन्यांना भुलवून सामान्य माणसाला फसवण्याचे प्रकार अनेकदा घडलेले आहेत. मात्र आता सामान्य माणसांनीच थेट खोटे दागिने खरे असल्याचे भासवत बँकेलाच फसवले. हा प्रकार अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या राहुरी तालुक्याच्या सोनगाव शाखेत उघडकीस आला आहे. जिल्हा बँकेच्या मुख्य कार्यालयातील व्यवस्थापक राजेंद्र शेळके यांच्या अधिपत्याखाली सोनगाव ता.राहुरी शाखेतील सोनेतारण दागिन्यांची सत्यता पडताळणी नुकतीच पूर्ण झाली. बँकेने नियुक्त केलेल्या सुवर्णपारखी (सराफ) यांनी १९१ कर्जदारांच्या दागिन्यांची सत्यता पडताळणी करता त्यात १३४ कर्जदारांचे सोने बनावट आढळले. 

दरम्यान आता १९१ पैकी ५७ कर्जदारांनी सोन्याचे दागिने सोडविल्याने बँकेची सुमारे ५० लाख रुपयांची वसुली झाली आहे. विशेष म्हणजे बँकेची फसवणूक करणारे काही प्रतिष्ठीत व्यक्ती सध्या फरार आहेत. जिल्हा सहकारी बॅंकेचे व्यवस्थापक राजेंद्र शेळके यांनी सांगितले की, बनावट सोने गहाण ठेवलेल्या १३४ कर्जदार व सोनगाव शाखेचा सुवर्णपारखी यांच्यावर बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी फौजदारी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. येत्या चार-पाच दिवसात गुन्हे दाखल केले जातील.   

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here