पाकिस्तानच्या गोळीबारात महाराष्ट्राच्या ‘या’ शहरातील वीरपुत्र शहीद, वयाच्या 20व्या वर्षी वीरमरण

मुंबई  :

ऐन दिवाळीत महाराष्ट्रावर खूप मोठा आघात झाला आहे. महाराष्ट्राची दिवाळी शोकमग्न जाणार आहे. पाकिस्तानने आज पुन्हा रडका डाव खेळत शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं. नेहमीप्रमाणे भारताच्या दिशेला बेछूट गोळीबार केला. पाकिस्तानच्या या रड्या डावाला भारताच्या शुरांनी चोख उत्तर दिले. मात्र या गोळीबारात भारतमातेने एक पुत्र गमावला. हा वीरपुत्र महाराष्ट्रातील रांगड्या अशा कोल्हापूरच्या मातीतला होता. कोल्हापुरच्या आजरा तालुक्यातील बहिरेवाडी गावाचे सुपुत्र ऋषिकेश जोंधळे शहीद झाले आहेत. जोंधळे पुँछ जिल्ह्याच्या सवजियान येथे सीमाभागात तैनात होते.

नियंत्रण रेषेला लागून असलेल्या डावर, केरन, उरी, नौगाम या भागांना पाकिस्तानकडून लक्ष्य करण्यात आलं आहे. पाक सैन्याच्या गोळीबाराला भारतीय लष्कराकडूनही चोख प्रत्युत्तर देण्यात येत असून सीमा सुरक्षा दलातील उपनिरीक्षक, दोन जवान या धुमश्चक्रीत शहीद झाले आहेत तर सहा नागरिकांनाही प्राण गमवावे लागले आहेत. 

पाक सैन्याकडून शुक्रवारी शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं जात होतं. पाकिस्तानी सैनिकांच्या गोळीबाराला उत्तर देताना ऋषिकेश गंभीर जखमी झाले. हेलिकॉप्टरमधून सैन्याच्या दावाखान्यात नेत असताना त्यांचं निधन झालं. जोंधळे शहीद झाल्याची बातमी बहिरेवाडीच्या गावकऱ्यांना संध्याकाळी समजली. त्यानंतर संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

ऋषिकेश हा ६ मराठा बटालियनमध्ये सेवा बजावत होता. ११ जून रोजी त्याने ड्युटी जॉइन केली होती. राष्ट्रीय खेळाडू असल्याने त्या माध्यमातून त्याची भारतीय लष्करात भरती झाली होती. त्याला एक लहान बहीण असून ऋषिकेशच्या निधनाने दु:खाचा डोंगरच जोंधळे कुटुंबीयावर कोसळला आहे. दरम्यान, ऋषिकेशचे पार्थिव उद्या रात्रीपर्यंत गावात पोहचेल असे सांगण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here