यशस्वी दुग्धोत्पादनातील पंचसूत्री घ्या लक्षात; मिळवा हमखास नफा

दुग्धव्यवसाय हा आता शेतीसोबत जोडधंदा म्हणून उरलेला नाही तर आता हा प्रमुख व्यवसाय बनला आहे. आजकाल विविध माध्यमातून आपल्यापर्यंत अनेक यशकथा येत असतात. ज्यात मी अमुक जातीची जनावरे घेऊन तमुक पशुखाद्य वापरले आणि आता एवढे दुध दिवसाला मिळते तेवढा नफा महिन्याला होतो, असे सांगितले जाते. बऱ्याचदा यशकथा खऱ्या असतात. अनेकदा अर्धवट माहितीच्या आधारे बनवलेल्या असतात. म्हणूनच आज आम्ही आपणास यशस्वी दुग्धोत्पादनातील पंचसूत्री सांगणार आहोत. ही पंचसूत्री लक्षात घेतल्यास आपल्या नफ्यात निश्चित वाढ होईल.

निरोगी प्रजनन संस्था, निरोगी पचन संस्था, स्वच्छ गोठा, स्वच्छ दूधनिर्मिती आणि रोग/जखमापासून जनावरांचा बचाव ही पंचसूत्री लक्षात घेऊन आपण दुग्धव्यवसायात उंची गाठू शकतो.

निरोगी प्रजनन संस्थाविषयी काही मुद्दे :-

–     जनावरांना खनिजद्रव्ये योग्य मात्रेत द्यावीत. ज्यामुळे उलटण्याचे प्रमाण कमी होते आणि प्रजनन संस्थेचे आरोग्य टिकून राहते.

–    तांत्रिक ज्ञान नसलेल्या व्यक्तीकडून वार काढल्यास गर्भाशयास इजा होण्याची शक्‍यता असते म्हणून वार अडल्यास स्वतः काढण्याचा प्रयत्न करू नये. 

–    गर्भाशयाचे गंभीर आजार झालेल्या जनावरांना इतर जनावरांपासून वेगळे करावे.

–    गर्भपात झालेले गर्भ आणि वार गोठ्यापासून लांब पुरून टाकावे. 

 निरोगी पचन संस्था आणि स्वच्छ गोठा :-

  • एकाच प्रकारचा चारा दिल्यास जनावराचे रवंथ करण्याचे प्रमाण कमी होते, त्यामुळे चाऱ्यात पुरेशी लाळ मिसळली न गेल्याने पोटाचे विकार संभवतात. जे जनावरांच्या निरोगी पचन संस्था हानिकारक ठरू शकतात.
  •  जनावरांना दिवसातून चार ते पाच वेळा थोडी थोडी वैरण द्यावी. एकाच वेळी चारा देऊ नये.
  • गोठ्यात ओलावा वाढल्यास जंतूंची वाढ होते. आजारी जनावराची वेगळी व्यवस्था करत आजारी जनावराची विष्ठा, मूत्र, उरलेला चारा जाळून टाकावा.
  • उन्हाळ्यात गोठा थंड ठेवण्याचा प्रयत्न करावा.
  • आठवड्यातून एकदा पाण्याचा हौद धुऊन चुन्याने रंगवून घ्यावा.

स्वच्छ दूधनिर्मिती आणि रोगराई :-

  • रोज दूध काढताना कोरडा आणि उग्र वास असलेला चारा जनावराला टाकू नये.
  • आजारी जनावरे किंवा अशक्त जनावरे स्वच्छ दुध देत नाहीत. दूध स्वच्छ नसल्यास टिकवणक्षमता कमी होऊन दूध नासते. 
  •  कासेत दूध राहिल्यास काससुजी होते म्हणून दूध पूर्ण काढावे.
  • दुध नेहमी मुठ्बंद पद्धतीने काढावे. जेणेकरून आपल्या नखांमार्फत जखमा होण्याची शक्यता कमी होते.
  • जर गायीची कास सुजलेली असेल तर दुध काढल्यावर जनावराला वैरण टाका जेणेकरून जनावर खाली बसणार नाही आणि जंतू छीद्रमार्गे कासेत जाणार नाहीत. (कास सुजलेली जनावरच्या सडाची छिद्रे साधारणपणे अर्धा तास उघडी राहतात.)

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here