शिवसेनेनं सांगितले भविष्य; काही काळासाठी ‘त्यांची’ वरात काढून ‘घोडे’ नाचवले जातील पण

मुंबई :

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनात आज बिहार निवडणुका आणि निकाल याविषयी भाष्य करत टीकाटिपण्णी करण्यात आली आहे.

नेमकं काय म्हटलं आहे सामनात :-

जनता दल युनायटेड पक्षाला लोकांनी धूळ चारली आहे. भारतीय जनता पक्षाने सरशी केली आहे. त्या सरशीसाठी भाजपने निवडणुकीच्या रिंगणात जे मोहरे फिरवले, त्यात ‘ओवेसी’ यांना पहिला क्रमांक द्यावा लागेल. ओवेसी हे मोदी पिंवा भाजपचे प्यादे असल्याचा आरोप नेहमीच केला जातो. बिहारातही तोच आरोप झाला. ओवेसी यांनी उमेदवार उभे केल्यामुळे तेजस्वी यादव व त्यांच्या आघाडीचे किमान 15 उमेदवार पराभूत झाले. या 15 जागांनीच बिहारच्या राजकारणाचे चित्र पालटून टाकले व तेजस्वी यादव यांची घोडदौड शेवटच्या टप्प्यात थांबली. चिराग पासवान यांचे प्रयोजन निवडणुकीत नितीशकुमार यांचे पंख छाटण्यासाठीच करण्यात आले. चिराग पासवान यांनी जनता दलाच्या विरोधात

जे उमेदवार उभे केले

त्यामुळे नितीशकुमार यांच्या 20 उमेदवारांना पराभव पत्करावा लागला. चिराग पासवान यांचा प्रचार हा नितीशकुमारांच्या विरोधात होता. तो प्रचार विषारी होता. असा विषारी प्रचार तेजस्वी यादवही करत नव्हते. इतके असूनही पंतप्रधान मोदी यांनी चिराग पासवान यांची समजूत काढलीच नाही व चिराग भैया आजही राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे घटक आहेत. बिहार निवडणुकांचे निकाल चंचल आहेत. बहुमत काठावरचेच आहे. कोणाचा पाय कधी घसरेल व मन कसे फिरेल, ते सांगता येत नाही. भारतीय जनता पक्षाचा ‘खेळ’ यशस्वी झाला. भाजपचा डंका वाजला. नितीशकुमारांची पीछेहाट झाली. आता काही काळासाठी नितीशकुमार यांची वरात काढून त्यात ‘घोडे’ नाचवले जातील, पण ही तात्पुरती व्यवस्था आहे, हे सांगायला कुणा राजकीय पंडिताची गरज नाही. खुर्चीवर नितीशकुमारांना बसवून ‘बादशाही’ची सूत्रं भाजपच्याच हाती ठेवली जातील. पण त्या बादशाहीवर ‘110’ आकडा असलेल्या भक्कम विरोधी पक्षाचा अंकुश राहील. तेजस्वी यादव या जिद्दी नेत्याची प्रतिमा बिहारच्या विधानसभा निवडणुकीत तावून सुलाखून निघाली. तेजस्वीच्या रूपाने फक्त बिहारलाच नाही तर देशालाच एक तडफदार युवा नेता मिळाला आहे. तो एकाकी लढत राहिला. तो विजयाच्या शिखरावर पोहोचला. तो जिंकला नसेल, पण त्याने पाठही टेकवली नाही. देशाच्या राजकीय इतिहासात या संघर्षाची नोंद नक्कीच होईल. बिहारमध्ये भाकरी फिरेल असे वाटले होते, पण भाकरी साफ करपली आहे. तेजस्वी यादव यांनी थोडी वाट पाहावी. भविष्य त्यांचेच आहे.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here