म्हणून घसरले पेरूचे भाव; वाचा काय आहे कारण

अहमदनगर :

गेल्या पंधरा दिवसांपासून पेरूचे दर घसरल्याने राहाता तालुक्यातील हजारो पेरू उत्पादक हवालदिल झाले असून विक्रीतून उत्पादन खर्चही सुटत नसल्याने करायचे काय अशी चिंता त्यांना सतावत आहे. स्थानिक तसेच राज्याच्या बाजारपेठेत व परराज्यातही मागणी कमी असल्याने पेरू उत्पादकांना मोठा फटका बसते असल्याने या वर्षाचा हंगामच वाया जात असून दोन दिवसावर आलेली दिवाळी सण हा शेतकर्‍यांना चिंता करायला लावणारी आहे. त्यामुळे सरकारकडून पेरू उत्पादक शेतकर्‍यांना मदतीची आशा आहे.
शेतकर्‍यांना खात्रीशिर पणे पैसा मिळवून देणारे पेरू पीक असल्याने राहाता तालुक्यात हजारो एकरावर पेरूची शेती पिकविली जाते. यातून शेतकर्‍यांना चांगले उत्पन्न मिळते. या पेरू बागांवर वाहन चालक, मजूर, बागवान या लाखो लोकांचा संसार चालतो. मात्र यावर्षी करोनामुळे सर्वत्र बाजारपेठा, मंदिर व शाळा बंद असल्याने पेरूची मागणी घटली आहे. त्यातच सततच्या मुसळधार पावसामुळे व बागांमधे चार महिने पाणी साचून राहिल्याने पेरू बागांना अनेक रोगांनी ग्रासले आहे. फळ गळाली, मुळ्या सडल्या, मोठ्या प्रमाणावर औषध फवारणी व मजुरी वाढली. मात्र मागणी घटल्याने 20 किलो पेरूच्या कॅरेटला अवघा 100 ते 150 रूपये दर मिळत असल्याने हे पीक परवडेनाशे झाले. यातून औषध व मजुरीही फिटत नसल्याने वर्षभराचे आर्थिक वेळापत्रकच कोलमडून गेले.
सरकारने शेतकर्‍यांना दिलेल्या नुकसान भरपाईतून पेरू बागा वगळल्याने शेतकर्‍याला कुणाचाच आधार उरला नाही. सरकारने पेरू उत्पादक शेतकर्‍यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी व या संकटातून त्यांना सावरण्यासाठी आधार द्यावा, अशी मागणी शेतकरी करत आहे. अखिल भारतीय पेरू उत्पादक महासंघाचे अध्यक्ष विनायक दंडवते यांनी ‘करोनामुळे बाजारपेठा, शाळा, कॉलेज व मंदिर बंद राहिली. ही सर्व ठिकाणे पेरू विक्रीची प्रमुख केंद्रे होती. सरकारने पेरू प्रक्रिया उद्योगासाठी प्रोत्साहन देण्याची गरज असून पेरू फळावर प्रक्रिया करणारे उद्योग वाढविण्याची गरज आहे’, असे मत व्यक्त केले आहे.

संपादन : विनोद सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here