बिहार निवडणुकीच्या निमित्ताने वाचा ‘राजकारणातील घराणेशाही’ या विषयावरील महत्वाचा लेख; पटलं तर शेअर करा

राजकीय घराण्यातील पुढील पिढ्यांना लॉन्च करण्याची भूमिका सर्व पक्षातील प्रमुख नेत्यांनी घेतली. याची सुरुवात राहुल गांधी, अखिलेश यादव पासून सुरू होऊन सुप्रिया सुळे, जगनमोहन रेड्डी, रोहित पवार, आदित्य ठाकरे, पार्थ पवार ते तेजस्वी यादव असे वर्तुळ पूर्ण करणारी आहे, पुढील काळात हे घराणेशाहीचे वर्तुळ आणखीन विस्तारणार आहे हे विशेष. त्यातही एकमेकांच्या भावी नेतृत्वाचे कौतुक करत आपले सत्ता संतुलन राखणे म्हणजे केवळ एकमेकांच्या पाठी खाजवण्याचा प्रकार राहिला आहे, असे दिसते. कन्हैया कुमार, हार्दिक पटेल, जिगणेश मेवानी आदी स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या युवकांना थप्पीला लावण्यात प्रस्थापित मंडळी यशस्वी झाली आहेत.

त्यामुळे सर्वोत्तम म्हणजे आम्हीच, हा अधिसत्ता निर्मितीचा यशस्वी प्रयोग राजकारणात सर्व राजकीय घराणी करत आहेत. याचा अर्थ असा की, घराणेशाही हे भारतीय राजकीय पक्षांचे महत्वाचे अंग बनले आहे. घराणेशाही शिवाय राजकीय पक्ष व नेतृत्व यांचे जीवित कार्य सिद्ध होऊ शकत नाही. बिहारमधील मतदारांना व भारतातील महाराष्ट्र सह मतदारांना सर्व राजकीय पक्षांनी भरघोस संख्येने रोजगार देण्याची घोषणा प्रचार निवडणूक काळात परिवर्तनवादी म्हटल्या जाणाऱ्या पक्षांनी केला आहे. आज एकवेळ लोक ऐकून घेतील, रोजगार निर्मितीचा अजेंडा समजून भुलतील पण भविष्यात रोजगार सोबतच सत्तेतील वाटा काय हा प्रश्न मतदार विचारतील अशी शक्यता आम आदमी पक्ष व नव्या राजकीय समिकरणातून आकाराला येत आहे.

सामान्य नागरिकांना सत्ताधारी बनवणारी राजकीय प्रणाली आज कोणत्याही पक्षाकडे नाही. सगळीकडे वर्षानुवर्षे मतदारसंघ, पदे, खुर्चीवर विराजमान असलेली सत्ताकेंद्र आहेत. भाजपसह सर्व पक्षांकडे आहेत. त्यामुळे राजकारणातील रोजगार म्हणजे पक्षातील बहुसंख्य जागा वा तिकीट जोपर्यंत सामान्य मतदार, कार्यकर्त्याला, केलेल्या कामाच्या जोरावर मिळणार नाही, तोवर राजकीय परिवर्तन आकारास येणार नाही. सध्या जे सुरुय त्यानुसार केवळ चेहरे बदलले आहेत, व्यवस्था तीच आहे आणि लाभार्थीही तेच आहेत. मतदारांनी मत द्यावे व आम्हाला निवडून द्यावे, त्या बदल्यात आम्ही तुम्हाला पैसे देऊ, नोकरी देऊ, झालंच तर विकास देऊ. या सगळ्या सेवेच्या प्रक्रियेत नेत्यांच्या पिढ्यांचे कल्याणकारी राज्य म्हणजे भारतच आहे ब्वा. भारतमाता की जय…

लेखक – हर्षल लोहोकरे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here