नाश्त्यासाठी चवदार आणि आरोग्यदायी पर्याय म्हणजे ‘ज्वारीच्या पिठाचा उत्तपा’; रेसिपी वाचा आणि नक्कीच ट्राय करा

प्रत्येक देश, राज्य आणि प्रांतामध्ये खाण्याचे प्रकार वेगवेगळे आहेत. प्रत्यके भौगोलिक प्रदेशातील खान-पान पद्धती वेगळ्या आहेत. महाराष्ट्रात जसे तांदळाच्या पिठाचे घावन बनवतो तसेच साऊथमध्ये डोसा आणि उत्तपा हे दोन पदार्थ खूप आवडीने खाल्ले जातात. आज आपण पौष्टिक आणि चवदार पर्याय आपल्या खवय्या वाचकांसमोर आणण्यासाठी २ खाद्य संस्कृतींचा मिलाप करून एक सुंदर रुचकर पदार्थ बनवला आहे. तो म्हणजे ‘ज्वारीच्या पिठाचा उत्तपा’

‘ज्वारीच्या पिठाचा उत्तपा’ बनवण्यसाठी साहित्य घ्या मंडळीहो…

 1. 1 कप उडदाची डाळ
 2. 3 कप ज्वारीचे पीठ
 3. 1/4 चमचा मेथी दाणे
 4. चवीनुसार मीठ
 5. 2 कांदे
 6. 2 टोमॅटो
 7. 1 ढोबळी मिरची हिरवी किंवा लाल
 8. 1/4 कप बारीक चिरलेली कोथिंबीर
 9. 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या
 10. 1/4 कप पोडी मसाला

हे साहित्य घेतले असेल तर वाट कसली बघताय… घ्या की बनवायला…

 1. सर्व प्रथम पाव चमचा मेथी दाणे टाकून उडदाची डाळ स्वच्छ धुऊन चार ते पाच तास ठेवावे. पाणी कमी करून आपण इडली किंवा डोसासाठी वाटतो तशी डाळ चांगली वाटून घ्यावी.
 2. डाळीमध्ये ज्वारीचे पीठ मिसळावे. चवीप्रमाणे मीठ टाकावे आणि परत एकदा मिश्रण छान मिक्स करून घ्यावे. बॅटर आपण ईडलीसाठी करतो तसे वाटप करावे. सुरुवातीलाच पाणी टाकून पातळ करू नये, झाकण ठेवून रात्रभर चांगले फरमेंट करावे. दिलेल्या सर्व भाज्या आपल्या आवडीनुसार लांब बारीक कापून घ्याव्यात.
 3. बॅटर फुलून दोन पट वाढते म्हणून पीठ एका मोठ्या भांड्यात ठेवावे. सहा ते सात तास चांगले फरमेंट होऊन द्यावे.
 4. आता करायच्या वेळेस पिठ चांगले हलवून थोडे चाखून बघावे जर मीठ कमी असेल तर तुम्ही वरून परत मी टाकू शकता.
 5. पॅन गरम करून त्यावर थोडेसे तेल टाकावे.  आपल्या आवडीनुसार उत्तपे पॅन मधे टाकावे, मग त्यावर बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, सिमला मिरची, कोथिंबीर, हिरवी मिरची हे सर्व टाकावे. आणि त्यावर पोडी मसाला भुरभुरावा.
 6. एका बाजूने उत्तपा छान मंद गॅसवर शेकून घ्यावा बाजूच्या कडा सुटल्या की मग उत्तपा खालून लाल खरपूस झाला आहे की नाही ते पाहावे आणि मग तो उलटून दुसऱ्या बाजूने सुद्धा दोन मिनिटं चांगला शिजू द्यावा.
 7. दोन्ही बाजूने छान लाल खरपूस भाजून झाला की मग प्लेटमध्ये काढून मस्त खोबऱ्याच्या चटणीबरोबर गरमागरम उत्तपा खायला घ्यावा.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here