अशोक चव्हाण निष्क्रिय, मराठा आरक्षण उपसमितीवरून हकालपट्टी करा; ‘या’ पक्षप्रमुखाची मागणी

मुंबई :

देशाच्या राजकीय पटलावर बिहार विधानसभा निवडणूक चर्चेत आहे तर महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक पटलावर मराठा आरक्षणाचा मुद्दा ट्रेंडीग आहे. आता मराठा आरक्षणाचा प्रश्न थेट राज्यपालांच्या दरबारी पोहोचला आहे. शिवसंग्राचे नेते विनायक मेटे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेत मराठा आरक्षण उपसमितीच्या अध्यक्ष पदावरून अशोक चव्हाण यांची हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे.

मेटे यांनी म्हटले की, शनिवारी आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांच्याशी मराठा आरक्षणावर चर्चा केली होती. आजही त्यांच्याशी चर्चा केली. मात्र, आरक्षणावर तोडगा निघेल असं वाटत नाही. त्यामुळे राज्यपालांनी लक्ष घालावे अशी मागणीही त्यांनी केली आहे. उपसमितीचे अध्यक्ष म्हणून अशोक चव्हाण निष्क्रिय ठरले आहेत. त्यांच्या कार्यपद्धती विषयी मराठा समाजात संतापाचे वातावरण आहे. त्यामुळे त्यांना पदावर ठेवू नये, असेही त्यांनी पुढे म्हटले आहे.

दरम्यान मंत्री अनिल परब यांनी स्पष्ट केले की, मराठा आंदोलकांना मी स्वत: जाऊन भेटलो आहे. त्यांचं निवेदन स्वीकारुन ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे देखील पाठवलं आहे. निवेदनात केलेल्या मागण्या अतिशय महत्त्वाच्या आहे. सरकार नक्कीच यासंदर्भात सकारात्मक विचार करेल, ज्यांना कुणाला राजकारण करायचे असेल त्यांनी ते करावं. सरकारला आरक्षणाचा प्रश्न सोडवायचा आहे. सरकार मराठा आरक्षणाबाबत प्रमाणिक आहे.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here