बिहार विधानसभा निवडणूक २०२०: स्वतः झिरो मात्र भाजपसाठी हिरो; वाचा, मोदींच्या ‘हनुमानाचा’ प्रताप

पटना :

बिहार विधानसभा निवडणूक 2020 निकालाची मतमोजणीला आज सकाळी 8 वाजता सुरुवात झाली आहे. निकालाच्या सुरुवातीच्या टप्प्यातील हाती आलेल्या माहितीनुसार एनडीए आणि महागठबंधनमध्ये काँटे की टक्कर पाहण्यास मिळाली होती. आता मात्र संपूर्ण चित्र पलटले असून भाजपप्रणीत एनडीएची विजयी वाटचालीच्या दिशेनं आगेकूच सुरू असल्याचं पाहायला मिळतंय.

बिहारमध्ये ‘टुडेज चाणक्य’नं तेजस्वी यादव यांच्या नेतृत्त्व महागठबंधनला 180 जागा मिळतील असं भाकित वर्तवलं होतं. मात्र, बिहारमध्ये परिस्थिती या उलट दिसत आहे. पण तरीही 50 लाखांच्या मतांची मोजणी अद्यापही बाकी आहे. त्यामुळे कधीही चित्र बदलू शकते, असाही राजकीय विश्लेषकांचा अंदाज आहे. 

आतापर्यंत बिहारमध्ये संयुक्त जनता दलाचा लहान भाऊ असलेल्या भाजपनं यंदा मात्र जोरदार मुसंडी मारली. त्यात भाजपला चिराग पासवान नेतृत्व करत असलेल्या लोकजनशक्ती पक्षाची मदत झाली. भाजपला आतापर्यंत 19.8 टक्के आणि जेडीयूला 15.4 टक्के मते मिळाली आहे. तर, आरजेडीला 22.9 टक्के मते मिळाली आहेत. जर लोजपाने जेडीयूच्या विरोधात उमदेवार दिले नसते तर जेडीयू बिहारमधील सर्वात मोठा पक्ष ठरला असता, असं जाणकारांचं म्हणणं आहे.

भाजप, जेडीयू आणि लोकजनशक्ती पार्टी यांची बिहारमध्ये आघाडी होती. आपण मुख्यमंत्री नितीश कुमार आणि त्यांच्या जेडीयूच्या विरोधात आहोत. पण भाजपच्या विरोधात नाही, असं स्पष्ट भूमिका लोजपचे प्रमुख चिराग पासवान यांनी घेतली. लोजप अध्यक्ष चिराग पासवान यांनी स्वत:ला ‘मोदींचा हनुमान’ म्हटलं होतं.

त्याशिवाय संपूर्ण निवडणुकीत चिराग यांनी आपण भाजपचे समर्थक असून निकालानंतर भाजपलाच पाठिंबा देणार असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळेही चिराग यांचा लोजपा भाजपची बी टीम असल्याचा मेसेज गेला होता. त्याचाही परिणाम पाहायला मिळाला आहे. सद्य परिस्थिती पासवान यांच्या लोजपचा एकही उमेदवार आघाडीवर नाही. मात्र स्वतः झिरो होत चिराग पासवान भाजपचे हिरो ठरले आहेत.  

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here