‘त्यांचा’ मोदींना सल्ला; त्यांची काय हालत झाली? याचे भान ठेवले तरी पुरे

मुंबई :

बिहार निवडणूक, अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांनी गमावलेले राष्ट्राध्यक्षपद आणि नोटबंदीच्या निर्णयाच्या अनुषंगाने आज सामनात काही महत्वाचे मुद्दे मांडत पंतप्रधान मोदींसह भाजपवर निशाणा साधला आहे.

‘नोटबंदी’ चार वर्षांची झाली. त्याचा उत्सव साजरा करणे म्हणजे या दळभद्री निर्णयामुळे ज्यांनी मरण पत्करले, नोकऱया गमावल्या, आत्महत्या केल्या, व्यापार-उद्योग उद्ध्वस्त झाले अशा सर्व उद्ध्वस्त लोकांच्या थडग्यावर बसून वाढदिवसाचा केक कापल्यासारखेच आहे. नोटबंदी, जीएसटीसारखे निर्णय देशहिताच्या मुळावर आले. चुका मान्य करून पुढे जाणे हीच नेतृत्वाची धमक असते. पण चुकांचे समर्थन करणे ही नवी राजकीय परंपरा बनू लागली आहे. अमेरिकेत प्रे. ट्रम्प नेमके हेच करीत होते. त्यांची काय हालत झाली? याचे भान ठेवले तरी पुरे, असे म्हणत शिवसेनेनं पंतप्रधान मोदींना सल्लाही दिला आहे.

‘विधानसभा निवडणुका पार पडल्या. तेथे राममंदिर, सुशांतसिंह राजपूतसारखे भौतिक विषय भाजपतर्फे आणले गेले. ते फेल गेले, पण तेजस्वी यादवने 10 लाख लोकांना रोजगार देण्याची मूठ मारताच बिहारचा माहोलच बदलून गेला. तेजस्वीच्या सभांना प्रचंड गर्दी होऊ लागली. त्यात बेरोजगार तरुणांचा भरणा सर्वाधिक होता. हे कसले लक्षण समजायचे? मुंबईत खून, आत्महत्येस प्रवृत्त करणे, आर्थिक फसवणूक अशा गुन्ह्यात अटक झालेल्या पिवळ्या पत्रकारासाठी भाजपचे लोक छात्या बडवत रस्त्यावर उतरतात. महाराष्ट्राचा अवमान करणाऱया नटीच्या समर्थनासाठी जपजाप्य करतात, पण नोटबंदीने लाखो लोक निराधार, बेरोजगार झाले त्यांच्यासाठी सहानुभूतीचा शब्द निघत नाही. यात काही पारदर्शक वगैरे म्हणता येणार नाही, असे म्हणत भाजप दुट्टपी भूमिका घेत असल्याचा आरोप शिवसेनेनं केला आहे.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here