शिवसेनेची भाजपवर जळजळीत टीका; ‘हे’ म्हणजे उद्ध्वस्त लोकांच्या थडग्यावर वाढदिवसाचा केक कापल्यासारखेच

मुंबई :

नोटबंदीसारखा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली घेतला गेला. त्याला ४ वर्ष झाली. याच पार्श्वभूमीवर आज सामनाच्या अग्रलेखात भाष्य करण्यात आलेले आहे. तसेच बिहार निवडणूकविषयीही काही मुद्दे मांडलेले आहेत.

नेमकं काय म्हटलं आहे सामनाच्या अग्रलेखात :-

विधानसभा निवडणुका पार पडल्या. तेथे राममंदिर, सुशांतसिंह राजपूतसारखे भौतिक विषय भाजपतर्फे आणले गेले. ते फेल गेले, पण तेजस्वी यादवने 10 लाख लोकांना रोजगार देण्याची मूठ मारताच बिहारचा माहोलच बदलून गेला. तेजस्वीच्या सभांना प्रचंड गर्दी होऊ लागली. त्यात बेरोजगार तरुणांचा भरणा सर्वाधिक होता. हे कसले लक्षण समजायचे? मुंबईत खून, आत्महत्येस प्रवृत्त करणे, आर्थिक फसवणूक अशा गुन्ह्यात अटक झालेल्या पिवळ्या पत्रकारासाठी भाजपचे लोक छात्या बडवत रस्त्यावर उतरतात. महाराष्ट्राचा अवमान करणाऱया नटीच्या समर्थनासाठी जपजाप्य करतात, पण नोटबंदीने लाखो लोक निराधार, बेरोजगार झाले त्यांच्यासाठी सहानुभूतीचा शब्द निघत नाही. यात काही पारदर्शक वगैरे म्हणता येणार नाही. ‘नोटबंदी’ चार वर्षांची झाली.

त्याचा उत्सव साजरा करणे म्हणजे या दळभद्री निर्णयामुळे ज्यांनी मरण पत्करले, नोकऱया गमावल्या, आत्महत्या केल्या, व्यापार-उद्योग उद्ध्वस्त झाले अशा सर्व उद्ध्वस्त लोकांच्या थडग्यावर बसून वाढदिवसाचा केक कापल्यासारखेच आहे. नोटबंदी, जीएसटीसारखे निर्णय देशहिताच्या मुळावर आले. चुका मान्य करून पुढे जाणे हीच नेतृत्वाची धमक असते. पण चुकांचे समर्थन करणे ही नवी राजकीय परंपरा बनू लागली आहे. अमेरिकेत प्रे. ट्रम्प नेमके हेच करीत होते. त्यांची काय हालत झाली? याचे भान ठेवले तरी पुरे.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here