जारचं पाणी विकणाऱ्यांनो इकडे द्या लक्ष; फक्त ISI प्रमाणित जारमधूनच पाणी विकण्याचे ‘त्यांनी’ दिले आदेश, ‘एवढे’ प्लांट केले सील

मुंबई :

राज्यात बाटलीबंद पाणी अनधिकृतपणे विकलं जात आहे. तसेच या पाण्याची स्वच्छता आणि दर्जा याबाबतही शंका आहे. अशा पाण्यामुळं लोकांच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण होत असल्याचं समोर आल्यावर राष्ट्रीय हरित लवादाने ‘पाण्याच्या मोठ्या बाटल्यांमधून विकलं जाणारं पाणी यापुढे आय एस आय शिक्क्यासहच विकलं जावं’, असे आदेश दिले आहेत.

राज्यात अनधिकृतपणे सुरु असलेले अशुद्ध पाण्याचे प्लांट तातडीने कारवाई करून बंद करण्याचे आदेशही प्रदूषण नियंत्रण मंडळ, एफ डी ए आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना दिलेत. लोकांच्या आरोग्याचे प्रश्न समोर येत आहेत तसेच अशुद्ध पाण्यामुळे आरोग्य बिघडल्यासंबंधीच्या घटनाही समोर आल्या आहेत. महाराष्ट्रात अशुद्ध पाण्याचा पुरवठा करणाऱ्या अनधिकृत प्लान्टची संख्या दहा हजारांच्या घरात आहे. मात्र कारवाई नेमकी करायची कुणी? यावरून संस्थांमध्ये जुंपली आहे.  प्रदूषण नियंत्रण मंडळ, एफ डी ए आणि स्थानिक स्वराज्य संस्था या अनधिकृत प्लान्टवर कारवाई करण्याची जबाबदारी एकमेकांवर ढकलत आहेत.

हे थंड पाण्याचे जार आरोग्यास अपायकारक असल्याचे सांगत प्रदूषण नियंत्रण मंडळ, एफ डी ए आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना कारवाईचे आदेश देण्यात आलेले आहेत. दरम्यान लाखो रुपये गुंतवून उभा केलेले प्लांट एक झटक्यात बंद पडले तर अनेक लोक मोठ्या आर्थिक संकटात सापडतील. महाराष्‍ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ तथा अन्न व औषधी प्रशासनाची परवानगी घेऊन पुन्हा सुरु करता येईल का? असेही प्रश्न प्लांट मालकांसमोर आहेत.

दरम्यान अमरावती जिल्ह्यात बेकायदेशीररित्या सुरु असलेले शहरातील जवळपास 150 आणि जिल्ह्यातील एक हजार आरओ वॉटर प्लॅन्टवर कारवाईचा बडगा उगारत हे प्लान्ट सील करणे सुरु केले आहे. 

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here