पण ‘त्यांनी’ माकडचेष्टा व राजकीय लफंगेगिरीलाच महत्त्व दिले : शिवसेना

मुंबई :

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या लागलेल्या निकालाच्या निमित्ताने शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखात भाष्य केलं आहे.

नेमकं काय म्हटलं आहे सामनात :-

अमेरिकेत सत्तांतर झालेच आहे, बिहार सत्तांतराच्या शेवटच्या पायरीवर आहे. अमेरिकेत प्रे. ट्रम्प महाशयांनी कितीही अकांडतांडव केले, तरी डेमॉक्रेटिक पक्षाचे जो बायडन हे दणदणीत मताधिक्याने राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकले आहेत. त्याच वेळी हिंदुस्थानातील बिहारच्या विधानसभा निवडणुकीत नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा पराभव होताना स्पष्ट दिसत आहे. आपल्याशिवाय देशाला किंवा राज्याला पर्याय नाही, या भ्रमातून नेत्यांना बाहेर काढण्याचे काम लोकांनाच करायचे असते. प्रे. ट्रम्प हे राष्ट्राध्यक्षपदासाठी कधीच लायक नव्हते. त्यांच्या माकडचेष्टा व थापेबाजीस अमेरिकेची जनता भुलली, पण त्याच ट्रम्प यांच्याबाबत केलेली चूक अमेरिकन जनतेने फक्त चार वर्षांत सुधारली. त्याबद्दल तेथील जनतेचे अभिनंदन करावे तेवढे थोडेच.

ट्रम्प यांनी सत्तेवर येण्यासाठी थापांचा पाऊसच पाडला. एकही आश्वासन, वचन ते पूर्ण करू शकले नाहीत. अमेरिकेत आज बेरोजगारीची महामारी कोरोनापेक्षा भारी आहे, पण त्यावर उपाय करण्यापेक्षा ट्रम्प फालतू विनोद, माकडचेष्टा व राजकीय लफंगेगिरीलाच महत्त्व देत आले. शेवटी लोकांनी त्यांना घरी पाठवले. आपण पुन्हा जिंकलो नाही तर अमेरिकेचे नुकसान होईल, चीनचा फायदा होईल वगैरे बाष्कळ विधाने ते करीत राहिले, पण जनतेने त्यांना मतपेटीतून ठणकावून सांगितले, ”आधी तुम्ही चालते व्हा, देशाचे काय ते आम्ही बघू?” पण पराभूत झाल्यावरही धडपणे सत्ता सोडतील ते ट्रम्प कसले? त्यांनी कोर्टबाजी, आरोप-प्रत्त्यारोप सुरू केले, इतकेच नव्हे तर आपल्या भाडोत्री समर्थकांना बंदुका घेऊन रस्त्यावर उतरवले, हिंसाचार घडवला. अशा माणसाच्या हाती अमेरिकेची सूत्रे चार वर्षे होती व हिंदुस्थानातील भाजप पुढारी व राज्यकर्ते ‘नमस्ते ट्रम्प’साठी कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी करीत होते.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here