समतेचे महामेरु : संत शिरोमणी शेख महंमद महाराज

सुमारे 400 वर्षापुर्वी इस्लामिक राजवट देशभर पसरलेली असताना मुस्लीम राजवटीच्या अमलाखाली दिल्लीच्या राजगादीवर औरंगजेब बादशहा सारखा धर्मवेडा बादशहा असताना समतेचा, एकतेचा पुरस्कार करणे म्हणजे धर्माच्या विरोधात बंड पुकारणे होय. परंतु धर्मातील सर्व विरोध झुगारुन संत शिरोमणी शेख महंमद महाराजांनी समतेवर आधारीत असणार्‍या वारकरी पंथाच्या शिकवणीचा प्रचार प्रसार करण्यासाठी कंबर कसली. कुठल्याही धर्माची शिकवण वाईट नसते मात्र स्वत:च्या स्वार्थासाठी देश विकायला निघालेल्या धर्माच्या ठेकेदारंनी तयार केलेली संहिता समजासाठी घातकच.

हिंदु मुस्लीम दोन्ही धर्मातील अनिष्ट रूढी, प्रथा, परंपरा, दांभिकतेच्या विरोधात आपल्या लेखणीच्या माध्यमातून संत शेख महंमद महाराजांनी विरोध करत प्रस्थापितांना धक्का दिला व अविरत समाज परिवर्तनाची ज्योत तेवत  ठेवली. संत शेख महंमद महाराजांच्या उपलब्ध लेखन साहित्यावरुन त्यांचे जीवन चरित्र रेखाटने अशक्य आहे. पण इतर संत महात्म्यांनी केलेल्या गुणगौरवावरून आणि महाराजांच्या लेखन साहित्यावरून आणि स्थानिक लोकांच्या मौखिक साधनावरून संत शेख महंमद महाराजांच्या जीवनाचे विविध पैलुंचे दर्शन होते. जन्माने मुसलमान असूनही-हिंदु- मुसलमान भेदाच्या अतीत जाऊन एकतेचा पुरस्कार त्यांनी केला.

कवीवर मोरोपंतांनी आपल्या ‘रुख्मीणी मालेत’ संत शेख महंमद महाराजांचे नाम गुंफताना म्हटले आहे की तारतिन कीर्तीचा, जो न लवे, त्या  मुसल-मानवा नाव । हर्षे शेख महंमद भगवज्जन मुसलमान मानावा ॥ याचा अर्थ असा की जो मानव लवत नाही अशा मुसळासारखा ताठ माणसाला या भगसागरातुन केवळ किर्तीच्या नावा तारू शकत नाही. म्हणुनच विनम्रतेचा आदर्श असलेल्या मुसलमान संत शेख महंमदाचा गौरव करावा असे संत शेख महंमद महाराजां विषयी  गुणवर्णन मराठी वाडमयात जागोजागी आढळतात.
रामदास स्वामी सारख्या हिंदु साधूने संत शेख महंमद महाराजांच्या गुणवर्णन करताना‘दृश्यवीण दर्शन ’ अनुभवून त्याला क्षेमेवीण अलिंगन दिले आहे. संत शेख महंमद महाराजांच्या पती प्रकट केलोला विनयभाव संत शेख महंमद महाराजांचा परमाथिर्र्क आधिकार , आणि समतेचा पुरस्कार व्यक्त करीत आहे.

लेखन साहित्य संत शेख महंमद महाराजांनी मराठी, हिंदी, उर्दु, फारसी या भाषेत बरीच रचना केलेली  आहे. त्यांचे मराठी साहित्य योगसंग्राम, पवन  विजय, निष्कलंकप्रबोध, रूपके, भारूडे, स्फुट अभंग, हिंदुस्थानी कविता, ज्ञानगंगा, सिजरा-जवी हे लेखात साहित्य उपलब्ध आहे. काळाच्या ओघात हे साहित्य नामशेष झाले असून काही साहित्य अप्रकाशित स्वरचित आहे पण उपलब्ध साधनातून संत शेख महंमद महाराजांचे विचारविश्व आणि व्यक्तीमत्व प्रकट होत आहे. संत शेख महंमद महाराजांनी योगसंग्राम ग्रंथाची रचना करताना आत्मा हा योद्धा आसुन या योध्याने मानाच्या  घोड्यावर स्वार होऊन अहंकाराशी युध्द आरंभ केला असून संकल्प-विकल्प काम क्रोध आळस या अवगुणांनी समृद्ध असे अहंकाराचे सैन्या समोर उभे ठाकले असतांना या  दुष्ट प्रवृत्तीच्या सैन्यावर विजय मिळवून आत्मा यशवंत झालेला असुन त्याने ब्रम्हांडशिखर गाठलेले आहे हाच योगसंग्राम ग्रंथाचा भावार्थ आहे.

संत शेख महमंद महाराजांचे गुरू चांद बोधले हे अतिशय उदार आणि समन्वयशील होते. त्यांनी शेख महंमद महाराजांना इस्लामाचे शाश्वत मर्म सांगुन त्यांना अध्यात्मज्ञानाचा उपदेश केला. आणि स्वतः संत शेख महंमद महाराजांनी या समन्वयशीलतेच्या वारसाचा उल्लेख करताना म्हटले आहे की, अविंध यातीस निपजालो । कुराण पुराण बोलो लागलो । वल्ली साधु सिध्दांस मानलो । स्वहित परहित गुणेक  ॥ संत शेख महंमद महाराजांना मराठी संताच्या मांदीयाळीत मानाचे स्थान मिळून समकालीन आणि उत्तरकालीन थोर संत पुरूषाने त्यांने नाव  परमादराने उच्चारले आहे. संत शेख महमंद महाराजांचा ज्ञानचक्षु सदैव उघडा असल्याने त्यांनी मुर्तीभजन करणार्‍या धर्मांध मुसलमानावर आणि मुर्तीभजणातून उध्वस्त होणार्‍या दुबळ्या हिंदुवर शब्दरुप शस्त्राने प्रहार करून त्यांना शाश्वताचा शोध घेण्यास प्रवृत्त केले आहे. अंधश्रद्धेवर आणि खुळचट धर्मकल्पनांवर आघात करताना त्यांच्या वाणीला दुधारी शस्त्राची धार आलेली आहे. परंतु या स्पष्टोक्तीपणाची, विवेक दृष्टीची किंमत तात्कालीन परिस्थित त्यांना मोजावी लागली. तर संत शेख महमंद महाराज धर्माने मुसलमान असल्यामुळे हिंदू देवतांची  निंदा करतात असा समज होत असे.

या कुंचबणेची अवस्था व्यक्त करताना म्हटले आहे. एक म्हणती हा जातीचा मलवंश । म्हणुन निखंदितो आमचा देवतांस। याचा मानु ना आम्ही विश्वास । प्रतिमा निखंंदील्या॥ परंतू संतांना जात नसते याची प्रतिती तुकाराम महाराज अभंगाद्वारे करतात, याता याती धर्म नाही विष्णुदासा किंवा सकळांसी येथे आहे अधिकार । कलीयुगी उध्दार हरिच्या नामे किंवा ज्याला नवजीता ईश्वर । त्याचा शोधू नये कुलाचार ॥ या उक्तीप्रमाणे संत कोणत्या जातीत जन्माला आले हे महत्वाचे नसून त्यांनी समाजाप्रती केलेले कार्य महत्वाचे आहे हे ध्यानात घेतले पाहिजे.

जसे की उच्च कुळात जन्म घेऊनही जो भक्त विन्मुख आहेत त्याचे जीवन व्यर्थ आहे. असे  त्यांनी हिंदुतील . उचनीचतेच्या कल्पनेचा धुव्वा उघडविला आहे. त्याच प्रमाणे त्यांनी मुसलमानांनाही चार गोष्टी सुनावाला आहेत ज्यांचा जन्म गर्भाच्या मुसेत होतो ते सर्व प्राणी मुसलमान होत. संत शेख महमंद महाराजांची दृष्टी शुध्द असल्यामुळे त्यांनी भेदाऐवजी सात्विक साम्यावर भर दिला ते योगसंग्राम मध्ये म्हणतात, सच्चापीर कहे मुसलमान । मर्‍हाटे म्हणती सदगुरूपुर्ण ।  परी दोहींत नाही भिन्नपण।  आखें खोल देखो भाई ॥
समाजात शुध्द परमार्थ भाव एकात्मतेचा भाव जागवण्यासाठी शेख महंमद बाबांनी केलेले समाजनिरीक्षण अत्यंत सुक्ष्म आणि व्यापक होते. अनेक देव देवतोंच्या उपासनेचे विधीविधान, त्यांचे उपासकांचे वर्ग, धर्मातील विकृतीचे स्वरूप, समाजाच्या समजुती त्यांच्या सामाजिक आचरणातील अनेक व्यंगे, या सर्व गोष्टीचा सुक्ष्म तपशील संत शेख महंमद महाराजांच्या रचनेत आढळतो. संत शेख महंमद महाराजांना खरे संंस्कार पित्याच्या सानिध्यात बालपणीच प्राप्त झाले.  त्यातच चांद बोधले सारखे गुरू मिळात्याने हिंदु – मुस्लीम संस्कारांच्या समन्वयातुन त्यांच्या चिंतन शिलतेतुन सकल भेदातील रहस्य उलगडलेले होते. अनेक संत पुरूषांच्या संगतीत त्यांचा संस्काररुपी वृक्ष बहरला होता.

संत शेख महंमद महाराज यांचा जन्म आष्टी तालुक्यातील वाहिरा या गावी झाला.महाराज हे योगी असल्याने त्यांना प्रदीर्घ जीवन लाभले असून ते गृहस्थाश्रमी होते. आज वाहिरा येथे त्यांची वंशावळाची चौदावी पिढी चालु आहे. संत शेख महमंद महाराज यांचा जन्म वाहिरा या गावी राजे महंमद पिता, फुलाई माता यांच्या पोटी झाला आहे. तर समाधी वाहिरा येथे सिध्द टेकडीवर घेतल्याचे अनेक पदावल्यातून दिसते.

आज ही त्यांचा वाहिरा येथे ज्ञानगंगा हा हस्तलिखित ग्रंथ उपलब्ध आहे. शेख महमंद बाबांना 14 नंबर जमिन इनाम दिल्याचा नामपट आणि सनद वाहिरा येथे उपलब्ध आहे. तसेच शेख महंमद महाराज  ग्रंथाचे, लेखनांचे अभ्यासक वाहिरा गावामध्ये आहेत. कालचक्राने दर 160 वर्षाचे भविष्य वर्तवणारे साठ संवत्सरी हा औरंगाबाद येथील वस्तुसंग्राहालयातील ग्रंथ वाहिरा येथुनच नेलेला आहे असे समजते.  शेख महमंद षडक्षरी मंत्र  हा श्रेष्ठ । उच्चारिता अनन्यभांवे हरती भवकष्ट ॥

आज देश जातीयवादाच्या विळख्यात आणि दहशतवादाच्या सावटाखाली असताना मावनतावादाला लागलेली अखेरची घरघर आणि संपूर्ण विश्व विनाशाच्या उंबरठ्यावर उभे असताना संत शेख महंमद महाराज याचे विचार आचरणात आणण्याची खरी गरज निमार्णण झाली आहे. हे काम संत शेख महंमद महाराज यात्रोत्सव अंकातून  साप्ताहिक राज्यकर्ता च्या माध्यमातून घडावे ही अपेक्षा.

लेखक : ह.भ.प. सिध्दीनाथ मेटे महाराज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here