मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी साधला जनतेशी संवाद; शेती आणि उद्योग संबंधित ‘या’ ४ प्रमुख मुद्यांवर केले भाष्य

मुंबई :

जगभरात येत असलेली  कोरोनाची दुसरी लाट ही त्सुनामी असू शकते, आपल्याकडे ती येऊ द्यायची नसेल तर गाफील राहून चालणार नाही, मास्क लावणे, हात धुणे आणि शारीरिक अंतराचे पालन करणे या त्रिसुत्रीचा अवलंब प्रत्येकाला करावाच लागेल हे सांगताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिवाळी प्रकाशपर्वाचा सण असल्याने प्रदूषण आणि गर्दी टाळून तो साधेपणाने आणि आनंदाने साजरा करावा, सुख समृद्धीसाठी उघडलेल्या आपल्या घराच्या दारातून कोरोनाला आत येऊ देऊ नये, असे आवाहन केले. मुख्यमंत्र्यांनी  फटाक्यांवर बंदी घालून आपल्यावर आणीबाणी लादायची नसून परस्पर विश्वासातून आपल्याला पुढे जायचे आहे असेही म्हटले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी  समाजमाध्यमाद्वारे राज्यातील जनतेशी थेट संवाद साधला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केले या महत्वाच्या ४ मुद्द्यावर भाष्य :-

  • – महाराष्ट्राने अनलॉक काळात उद्योग क्षेत्रात मोठी झेप घेतल्याचे मुख्यमंत्री यांनी सांगितले. ते म्हणाले, पहिल्या टप्प्यात 17 हजार तर दुसऱ्या टप्प्यात 35 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक महाराष्ट्रात झाली. महाराष्ट्रात गुंतवणूक केलेल्या उद्योजकांना आवश्यक असलेल्या जमीन आणि इतर सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
  • – लोकांचा पैसा लोकहितासाठी वापरला जात असल्याचे स्पष्ट करून मुख्यमंत्र्यांनी जून ते ऑक्टोबर 2020 या काळात 41 लाख हेक्टर जमीन अतिवृष्टी, पुराने बाधित झाल्याचे सांगितले. यात मोठ्याप्रमाणात शेतपिकांचे नुकसान होताना घरे पडली, जमिनी वाहून गेल्या. यासर्वांना मदत करण्यासाठी 10 हजार कोटी रुपयांचा निधी देण्यात आल्याचेही ते म्हणाले.
  • – मुख्यमंत्र्यांनी राज्यात कापूस खरेदी केंद्रे सुरु झाल्याचे सांगतांना उडीद, मूग, सोयाबीन, तूर यासारख्या इतर शेतपिकांची शासन खरेदी  करणार असून  येत्या महिनाभरात ही केंद्र  सुरु करण्यात येतील अशी माहिती यावेळी दिली.
  • – मुंबई – ठाणे प्रवास गतिमान होण्यासाठी मेट्रो मार्गिकेसाठी जर्मनीच्या केएफडब्ल्यू विकास बँकेकडून 45 दशलक्ष युरोचे कर्ज माफक व्याजदरात घेण्यास मान्यता देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी महाराष्ट्रात गुंतवणूक करताना खूप आश्वासक वाटत असल्याची प्रतिक्रिया गुंतवणूकदार देत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी आवर्जुन सांगितले.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here