‘ते’ प्रकरण निर्भयापेक्षा हाथरसकांडापेक्षा भयंकर; संजय राऊतांचा हल्लाबोल

मुंबई :

सामनाच्या रोखठोक या सदरातून आज खासदार व कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी अर्णव प्रकरणावर भाष्य केले आहे. व त्या अनुषंगाने टीका करत काही प्रश्नही उपस्थित केले आहेत.

नेमकं काय म्हटलं आहे रोखठोकमध्ये :-

पत्रकारांना काडीचीही किंमत न देणाऱया डोनाल्ड ट्रम्प यांचा अमेरिकेच्या सूज्ञ जनतेने तसा पराभव केलाच आहे. (पण ट्रम्प त्यांची हार मानायला तयार नाहीत.) श्री. ट्रम्प हे कसेही असले तरी व्हाईट हाऊसमध्ये पत्रकार परिषदा घेत होते व पत्रकारांनाच ‘ज्ञान’ देत होते. ट्रम्प यांची अमेरिकेतून गच्छंती प्रक्रिया सुरू असतानाच अर्णब गोस्वामींच्या अटकेविरोधात देशातील प्रमुख राजकीय पक्ष भाजप रस्त्यावर उतरला. गोस्वामी यांची अटक म्हणजे देशाच्या चौथ्या स्तंभावर म्हणजे मीडियावर हल्ला असे सांगण्यात आले. गोस्वामी यांनी गुन्हा केला आहे. त्यांनी मुंबईतील एका मराठी उद्योजकाचे पैसे बुडवले. त्या तणावातून अन्वय नाईक व त्याच्या वृद्ध आईने आत्महत्या केली. नाईक यांच्या मृत्यूस गोस्वामी जबाबदार आहेत अशी ‘सुसाईड नोट’ मृत्यूपूर्वी लिहून ठेवली. हा पुरावा असताना आधीच्या भाजप सरकारने या सर्व प्रकरणाचा गळाच दाबला. त्या दडपलेल्या गुन्ह्याची पुन्हा चौकशी करणे हा काय अपराध झाला? पोलिसांनी गोस्वामी यांना अटक केली हा वृत्तपत्र स्वातंत्र्यावर कसा हल्ला होऊ शकेल? पंतप्रधान मोदी वगळता संपूर्ण मंत्रिमंडळ, भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री अर्णब गोस्वामींच्या बाजूने उभे राहिले व मृत अन्वय नाईक, त्यांची पत्नी, मुलगी यांचा आवाज दडपण्यात आला. हे प्रकरण निर्भयापेक्षा, हाथरसकांडापेक्षा भयंकर आहे.

अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर, चौथ्या स्तंभावर घाला म्हणजे नक्की काय? ते ‘गोस्वामी झिंदाबाद’चे नारे देणाऱ्यांना ‘पाठशाला’ घेऊन समजून सांगायला हवे. आणीबाणीची आठवण यानिमित्ताने काढली. आणीबाणीत वृत्तपत्र स्वातंत्र्याचे हवन झाले हे सत्य व त्याचा फटका बाळासाहेब ठाकरे यांना बसला. महाराष्ट्रात काँग्रेसचे राज्य होते व त्यांनी बाळासाहेब ठाकरे संपादक असलेल्या ‘मार्मिक’ प्रेसलाच टाळे ठोकले. ही दडपशाहीच होती. त्या दडपशाहीला झुगारून आणीबाणीत ‘मार्मिक’ प्रसिद्ध होत होता. वर्ध्याच्या पवनार आश्रमात विनोबांच्या छापखान्यावर तेव्हा धाडी पडल्या. इंदिरा गांधींना आव्हान देणाऱया रामनाथ गोयंकांच्या ‘इंडियन एक्प्रेस’ वृत्तपत्र समूहांवर धाडी पडल्या. संपादकांवर दबाव आले. दोनशेपेक्षा जास्त खटले रामनाथ गोयंकांवर दाखल केले. हा माझ्या दृष्टीने अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला होता. ‘महानगर’चे तत्कालीन संपादक हे शिवसेना व शिवसेनाप्रमुखांवर खालच्या पातळीवर टीका करीत तेव्हा शिवसैनिकांनी त्यांच्यावर दोन वेळा हल्ला केला व वागळे यांच्या समर्थनार्थ देशभरातील पत्रकार शिवसेना भवनासमोर एकवटले होते. ‘लोकसत्ता’चे माजी संपादक असताना कुमार केतकर यांच्या घरावर हल्ला झाला. हा वृत्तपत्र स्वातंत्र्यावरचाच हल्ला होता. अर्णब गोस्वामी यांच्या समर्थनार्थ भाजप उतरला, पण पत्रकार लांब आहेत. कारण गोस्वामी यांच्या पत्रकारितेने संपूर्ण क्षेत्रालाच बदनाम आणि कलंकित केल्याची भावना आहे.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here