अवघ्या ४ दिवसांच्या बाळंतीण झालेल्या शारदाबाई पवारांची ही गोष्ट; वाचा, खुद्द शरद पवारांनी सांगितलेला किस्सा

राज्याच्या आणि देशाच्या राजकारणातील उत्तुंग व्यक्तिमत्व असणारे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या बाबतीत अनेक कथा, दंतकथा, वदंता प्रसिद्ध आहेत. कधी कधी पुरेसे संख्याबळ नसतानाही दिल्लीला झुकविणारे शरद पवार यांना राजकारणाचं बाळकडू त्यांच्या आईकडून मिळाले. शरद पवारांपेक्षा त्यांच्या आईचा संघर्ष मोठा आहे. लोकनेते यशवंतराव चव्हाण वांग्मय पुरस्कार शरद पवार यांच्या लोक माझे सांगाती या पुस्तकाला दिला गेला होता. औरंगाबाद येथे मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीने हा पुरस्कार दिला गेला. त्यावेळी झालेल्या भाषणात शरद पवारांनी सांगितलेला हा किस्सा :-

माझ्या राजकीय वाटचालीला नुकतीच पन्नास वर्षे पूर्ण झाली आहेत. राज्याच्या मुख्यमंत्रिपदावर काम केले. केंद्रात मंत्री झालो. 14 निवडणूक लढलो परंतु सुदैवाने एकही निवडणूक हरलो नाही. या सगळ्यामागे जर कुणाची प्रेरणा होती तर ती माझ्या आईची होती. महिला कधीच राजकारणात नव्हत्या, तेव्हा माझी आई काँग्रेसच्या चळवळीत काम करत होती. तेव्हाच्या डिस्ट्रिक लोकल बोर्डाच्या निवडणुकीत महिला उमेदवार मिळत नसल्याने पक्षाने माझ्या आईला निवडणूक लढवायला सांगितले. तीही तयार झाली. निवडणूक लढवली आणि ती निवडून आली. पुण्यात एका बैठकीसाठी तिला बोलावलं चार दिवस आधीच ती बाळंतीन झाली होती. चार दिवसांच्या बाळाला घेऊन ती पुण्यात गेली आणि बैठकीला हजर राहिली.

तेव्हा ‘चार दिवसांची बाळांतीन बाई आपल्या बाळाला घेऊन बैठकीला येते याचा आदर्श सगळ्यांनी ठेवा’ असे लोकल बोर्डाचे अध्यक्ष शंकरराव मोहिते यांनी सगळ्यांना सांगितले. ‘त्या बाईच्या कवेत चार दिवसांचे बाळ होते आणि त्याचे नाव शरद पवार होते’ असे सांगत पवारांनी त्यावेळी भाषणाला पूर्णविराम दिला आणि त्यांच्या या भाषणासाठी सभागृहाने टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here