योग्य ती खबरदारी घेऊन ‘तेव्हा’ शाळा सुरू करा; मुख्यमंत्री ठाकरेंचे आदेश

मुंबई :

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहून प्रशासनाने शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. मधल्या काळात प्रशासनाकडून शाळा सुरु करण्यासाठीची सूचक वक्तव्य करण्यात आले होते. अशातच 23 नोव्हेंबरपासून राज्यातील शाळा सुरू होणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली होती. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठीची योग्य ती खबरदारी घेऊन दिवाळीनंतर राज्यातील नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यात याव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित बैठकीत मुख्यमंत्री श्री. ठाकरे बोलत होते. या वेळी शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड, राज्यमंत्री बच्चू कडू, अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, जागतिक परिस्थिती पाहता कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे दिवाळीनंतर पुढचे काही दिवस अधिक सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. ज्या शाळांमध्ये क्वारंटाईन सेंटर्स तयार करण्यात आले होते, ते सेंटर्स बंद करता येणार नाहीत. अशा ठिकाणच्या शाळा पर्यायी जागेत सुरू करता येतील का, याबाबत स्थानिक प्रशासनाने निर्णय घ्यावा.

शाळांचे सॅनिटायजेशन, शिक्षकांची कोरोना तपासणी यासारख्या सर्व बाबींची काळजी घेणे आवश्यक आहे. ज्या घरातील व्यक्ती किंवा मुले आजारी आहेत अशा पाल्यांना पालकांनी शाळेत पाठवू नये, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले आहे.

शाळा सुरू होण्यापूर्वी सर्व शिक्षकांची आरटीपीसीआर चाचणी दि. १७ ते २२ नोव्हेंबरदरम्यान स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून करून घेतली जाईल, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी यावेळी दिली. दि.२३ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या शाळांमधे विद्यार्थ्यांचे थर्मल चेकिंग करण्यात येईल.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here