काँग्रेसचे 26 आमदार ईडीच्या रडारावर; वाचा, काय आहे प्रकरण

जालंधर :

केंद्र सरकार विविध सरकारी संस्थांचा वापर करून आपल्या विरोधात असणाऱ्या पक्षांच्या नेत्यांना संकटात अडकवते, असा आरोप कॉंग्रेसकडून नेहमीच भाजपवर केला जातो. अशातच आता एका धक्कादायक वृत्त समोर आले आहे. काँग्रेसचे तब्बल 26 आमदार ईडीच्या रडारावर असल्याची माहिती मिळत आहे. या प्रकरणातील सर्वात विशेष बाब म्हणजे कॉंग्रेसचे सरकार असलेल्या पंजाब राज्यातील हे सर्व आमदार आहेत आणि केंद्र सरकारने संमत केलेल्या कृषी कायद्याला या आमदारांनी आणि पंजाब सरकारने विरोध केला होता.

बेकायदा उत्खनन प्रकरणी या आमदारांना ईडी नोटीस पाठविण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.  चार वर्षांनी पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांचा मुलगा रणइंदर यांच्या विरोधातील फाईल पुन्हा उघडल्यानंतर आता 26 आमदारांवर ईडीने लक्ष केंद्रीत केले आहे. या कॉंग्रेस आमदारांनी भाजप आणि केंद्र सरकारविरोधात नेहमीच आक्रमक भूमिका घेतली आहे. ईडीला या तपासासाठी परवानगीही मिळालेली आहे. ईडीचे अनेक मोठे अधिकारी सध्या जालंधरमध्ये तळ ठोकून असल्याचे समजत आहे. ईडी थेट मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानापासून तर आमदारांपर्यंत कारवाई करणार असल्याचे समजल्याने पंजाबमधील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ निर्माण झाली आहे. 

खाण घोटाळा हा तेथील मोठा घोटाळा आहे. पंजाबमध्ये शिरोमणी अकाली दल आणि भाजपवरही बेकायदा उत्खननाचा आरोप लागला आहे.  विशेष म्हणजे कॉंग्रेसने या घोटाळ्यात आरोपींना अटक करू, असे आश्वासन प्रचारात दिले होते. कॉंग्रेस सत्तेत आली आणि चक्क खाण घोटाळ्याचे आरोप अमरिंदर सरकारवरही होऊ लागले. या प्रकरणात एका कॉंग्रेस मंत्र्यांना मंत्रीपद सुद्धा सोडावे लागले.      

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here