२ दिवसात सोन्याच्या दरात झाली ‘एवढी’ वाढ; चांदीही महागली

दिल्ली :

अमेरिकन निवडणूक आणि सणावारांचा चालू झालेला सिझन याचा परिणाम सोने-चांदीच्या दरावर जाणवू लागला आहे. सणासुदीच्या काळात दरात वाढ होणे, हे मार्केटचे मूळ लक्षण आहे. त्यामुळे धनत्रयोदशी आणि दिवाळीमुळे नोव्हेंबर महिन्यात सोन्याचांदीच्या दरात वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. अवघ्या २ दिवसात सोन्याचे भावात झटकन वाढ झाली आहे. सोन्याचे दर 1600 रुपये प्रति तोळा तर चांदीचे दर 2700 रुपये प्रति किलोने वाढले आहेत.

अमेरिका राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत जो बायडन यांचा विजय निश्चित झालेला आहे. त्यामुळे सोन्याच्या किमतीत आंतरराष्ट्रीय बाजारातही वाढ झाली आहे. येणाऱ्या आठवड्यात सोन्याची किंमत मोठ्या प्रमाणात वाढू शकते, असा अंदाज HDFC सिक्योरिटीजच्या विश्लेषकांनी सांगितला आहे.

अमेरिकेत सत्ता परिवर्तन होण्याबरोबरच जास्त आर्थिक प्रोत्साहन पॅकेज मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. त्यामुळे सोन्याच्या दरात मोठी वाढ होते आहे, असा अंदाज वरिष्ठ विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याची किंमत वाढून 1,950 डॉलर प्रति औंसवर पोहोचली आहे. तर चांदीचे भाव 25.44 डॉलर प्रति औंसवर आहेत.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here