जेव्हा बकऱ्याशिवाय बकरी ईद तेव्हाच फटाक्यांशिवाय दिवाळी साजरी होईल; ‘या’ भाजप खासदारांचे वादग्रस्त वक्तव्य

दिल्ली :

कोरोनामुळे यंदा दिवाळी सणावर सावट आहे. दिवाळीत जर जास्त प्रदूषण झाले तर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे दिवाळी साधेपणाने साजरी करावी, असे आवाहन केले जात आहे. देशभरातील दिल्ली, राजस्थान, ओडिशा, चंदीगड, कर्नाटक या राज्यांनी फटाक्यांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. अशातच ‘ज्यावर्षी बकऱ्याशिवाय बकरी ईद साजरी केली जाईल, तेव्हा फटाक्यांशिवाय दिवाळी साजरी होईल’, असे वादग्रस्त विधान भारतीय जनता पक्षाचे खासदार साक्षी महाराज यांनी केले आहे.

दिवाळीच्या फटाक्यांबाबत देशभरात काही राज्यांनी बंदी घालण्याचा तर काही राज्यांनी साधेपणाने दिवाळी साजरी करण्याचा निर्णय घेतला असताना साक्षी महाराज यांनी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे वातावरण अजूनच चिघळण्याची शक्यता आहे. सातत्याने वादग्रस्त विधाने करून वाद निर्माण करणाऱ्या साक्षी महाराजांनी फटाके न फोडण्याच्या राज्यांच्या निर्णयावर फेसबुकवर जोरदार भाष्य केले आहे.

विशेष म्हणजे सध्या साक्षी महाराज कोरोना पॉझिटिव्ह आहेत आणि दिल्लीत आयसोलेशनमध्ये असताना त्यांनी समाज माध्यमांमध्ये वादग्रस्त भाष्य केले आहे. दरम्यान साक्षी महाराज यांनी केलेल्या पोस्टवर अनेकांनी समर्थन दिले आहे तर बहुतांश लोकांनी टीकाही केली आहे.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here