बलात्कार, हत्येप्रकरणी जन्मठेप भोगत असलेला राम रहीम दिसला तुरुंगाबाहेर; वाचा काय आहे प्रकरण

चंदिगढ :

सुरुवातीच्या धार्मिक आणि अध्यात्मिक गुरूचा मुखवटा पांघरलेला डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीमचे एकेक कांड बाहेर आले. नंतर बलात्कार, हत्या यासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये त्याचे नाव आले. अखेर तो दोषी ठरला आणि आता तो जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. अशातच राम रहीम तुरुंगाबाहेर आला होता, अशी चर्चा आहे. अर्थात तो गुपचूप पॅरोलवर बाहेर आला होता. हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या नेतृत्वाखालील बीजेपी-जेजेपी सरकारने राम रहीमला २४ ऑक्टोबर रोजी एका दिवसाचा पॅरोल दिला होता, असे उघड झाले आहे. 

माहितीनुसार राम रहीमला त्याच्या आजारी आईची भेट घेण्यासाठी एका दिवसाचा पॅरोल देण्यात आला होता. राम रहीमची आई गुरुग्राममधील एका रुग्णालयात उपचार घेत आहे. डेराप्रमुख राम रहिमला रोहतकमधील सुनारिया कारागृहातून गुरुग्राममधील रुग्णालयात चोख बंदोबस्तामध्ये नेण्यात आले होते, अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.

राम रहीमचे अजूनही काही ठिकाणी भक्त आढळून येतात. तो जेलमध्ये असला तरी त्याचा काही भागावर प्रभाव अद्यापही आहे. दरम्यान बंदोबस्तात बाहे आणलेल्या राम रहीम २४ ऑक्टोबरला संध्याकाळपर्यंत आपल्या आईसोबत होता. त्याच्या सुरक्षेसाठी जवळपास २५० ते ३०० सैनिक होते. त्याने जेव्हा आईची भेट घेतली तेव्हा फ्लोअर पूर्णपणे रिकामा केला गेला होता.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here