शिवसेनेला मोठा धक्का : ‘त्या’ जिल्ह्यातील आमदाराचं सदस्यत्व धोक्यात; जात प्रमाणपत्र झालं रद्द

जळगाव :

यावेळी झालेल्या विधानसभा निवडणुका खऱ्या अर्थाने राजकीय इतिहासात लक्षात राहतील, अशा होत्या. अनेक वर्षांची युती असलेल्या पक्षांनी एकमेकांची साथ सोडणे, कायम विरोधक असणाऱ्या राष्ट्रवादीच्या अजितदादांनी भाजपशी केलेली हातमिळवणी, २४ तासाच्या आता फडणवीसांच्या हातातून गेलेली सत्ता, आणि कधीच कुणी स्वप्नातही पहिली नसेल अशी कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेची तयार झालेली आघाडी. , शिवसेना ५६, राष्ट्रवादी ५४ आणि काँग्रेस ४४ असं पक्षीय संख्याबळ आहे, इतर पक्ष आणि अपक्षांचा पाठिंबा घेत राज्यात महाविकास आघाडीने बहुमत सिद्ध केलं. सध्याच्या सत्तेत असलेल्या पक्षांना एकेक आमदार महत्वाचा आहे. विशेषकरून शिवसेनेला आमदारांना सांभाळणे गरजेचे असताना शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.

नंदुरबार जात पडताळणी समितीने चोपडा येथील शिवसेनेच्या आमदार लता चंद्रकांत सोनवणे यांचा जातीचा दाखला अवैध असल्याचे सांगितले आहे. दरम्यान या घटनेमुळे आमदारकीलाही थेट धोका आहे. आमदारकीला आणि जळगाव मनपा निवडणुकीला सोनवणे यांनी सादर केलेलं जात प्रमाणपत्र अवैध ठरविण्यात आलं आहे. सोनवणे यांनी नामनिर्देशन पत्रासोबत टोकरे कोळी जातीचे प्रमाणपत्र जोडले होते. या घटनेमुळे जिल्हा शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.

२०१९ झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेकडून लता सोनवणे यांना तिकीट देण्यात आलं, त्यांच्याविरुद्ध जगदीशचंद्र रमेश वळवी(राष्ट्रवादी काँग्रेस), प्रभाकर गोटू सोनवणे(भाजपा बंडखोर) माधुरी पाटील(अपक्ष), डॉ. चंद्रकांत बारेला(अपक्ष) या प्रमुख उमेदवारांनी लढत दिली. यात पराभूत उमेदवार जगदीशचंद्र वळवी यांनी आमदार सोनवणे यांच्या जात प्रमाणपत्राला औरंगाबाद उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here