कॉलेज सुरू करण्याबाबत शिक्षणमंत्र्यांचे महत्वाचे भाष्य; वाचा, नेमकं काय म्हटलं आहे त्यांनी

मुंबई :

लॉकडाऊनपासून बंद असलेली शाळा महाविद्यालये कधी उघडली जाणार, याबाबत अजूनही साशंकता आहे. अधून मधून सरकारकडून शाळा-महाविद्यालये उघडली जाण्यासाबंधी सूचक वक्तव्ये केली जात असली तरी नेमकं कधी उघडणार, याबाबत अजून खात्रीलायक कुणीच सांगितलेले नाही. दरम्यान आता दिवाळीनंतर म्हणजे १६ नोव्हेंबरपासून देशातील महाविद्यालये व शिक्षण संस्था सुरू करण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) हिरवा कंदील दाखवला आहे. महाराष्ट्रात कोरोना परिस्थिती काही अंशी नियंत्रणात आलेली असली तरीही धोका अद्याप कायम आहे. याच पार्श्वभूमीवर ‘राज्यात कॉलेज सुरू करण्याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. यूजीसीने गाईडलाईन दिली आहे, त्याबाबत सगळ्या कुलगुरुंची बैठक घेऊ’, असं उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत म्हणाले आहेत. 

पुढे बोलताना ते म्हणाले की, शासनाशी चर्चा करून विद्यापीठाने निर्णय घ्यावा, असं यूजीसीने सांगितलं आहे. दिवाळीनंतर आम्ही बैठक घेऊ, सध्या कोणताही निर्णय घेतलेला नाही. विद्यापीठ, महाविद्यालयांमधील कोविड परिस्थिती लक्षात घेता यूजीसीनं काही सूचना केल्या आहेत.विद्यार्थ्यांच्या सुरक्षा दृष्टिकोनातून विचार करून निर्णय घेऊ. यूजीसीने पत्र दिलं आहे, त्याचा सकारात्मक विचार केला जाईल.

 राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेतली होती, त्यावेळी ते बोलत होते. कंटेनमेंट झोन नाहीत अशा विभागांतील महाविद्यालये टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात यावेत तसेच या संबंधित मार्गदर्शक सूचनाही विद्यापीठ अनुदान आयोगाकडून जारी करण्यात आल्या आहेत. या सर्वात विशेष गोष्ट म्हणजे आरोग्य सेतू ॲपवरून एवढा गोंधळ उडाला असला तरीही महाविद्यालयातील प्रवेशासाठी विद्यार्थ्यांच्या मोबाइलमध्ये आरोग्य सेतू ॲप असणे बंधनकारक असेल.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here