त्यांच्या रक्तात आणि ‘त्यात’ काहीतरी गडबड आहे; शिवसेनेचा जहरी टीका

मुंबई :

रिपब्लिकटीव्हीच्या अर्णब गोस्वामी यांना अटक झाली. त्यानंतर भाजपने जी भूमिका घेतली त्यातून जे वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला जात आहे, त्यावर आजच्या सामनाच्या अग्रलेखात भाष्य करत टीका करण्यात आली आहे.

नेमकं काय म्हटलं आहे सामनात :-

आणीबाणीनंतर इंदिरा गांधींचा पराभव जरूर झाला, पण त्याच इंदिरा गांधींना देशाच्या जनतेने पुन्हा विजयी केले. देशाच्या अखंडतेसाठी इंदिराजींनी शेवटी प्राणाचे बलिदान दिले. असा दुर्दम्य त्याग नंतर एखाद्या तरी पंतप्रधानाने केला असेल तर दाखवा. त्यामुळे भाजपने दिल्लीच्या रस्त्यावर इंदिराजी व उद्धव ठाकरे यांचे एकत्र चेहरे लावले असतील तर त्याचे स्वागत आहे. यानिमित्ताने त्यांनी पाळण्यात बसून पुन्हा इतिहासाचे वाचन केले तर बरे होईल. म्हणजे सदोष मनुष्यवध प्रकरणातील आरोपीच्या समर्थनार्थ दंडास काळय़ा पट्टय़ा आणि पायांत गुलामीचे घुंगरू बांधून नाचायची वेळ येणार नाही.

पंतप्रधान, राष्ट्रपती, लष्करप्रमुख, राज्यपाल अशा पदांवरील व्यक्तींचा एकेरी आणि ‘अरे-तुरे’च्या भाषेत जाहीर उद्धार केलेला भाजपला चालणार असेल तर त्यांनी तसे सांगावे. म्हणजे त्यांच्या दंडावरील काळय़ा पट्टय़ांचे आम्हीही स्वागत करू. अमित शहा, मोदी वगैरे नेत्यांशी मतभेद असू शकतात. म्हणून ‘एकेरी’वर जाऊन त्यांच्यावर चिखलफेक करणे आम्हाला मान्य नाही. ही ‘ट्रम्प’ संस्कृती हिंदुस्थानात कोणी रुजवत असेल तर त्यांनी अमेरिकेत सुरू झालेल्या अराजकाकडे डोळसपणे पाहायला हवे. तसे अराजक कोणाला हिंदुस्थानात हवे आहे काय? राजकारणात देशाचे वाटोळे होऊ नये, देशाचे स्वातंत्र्य, लोकशाहीचा सदोष मनुष्यवध घडू नये हीच आमची प्रामाणिक इच्छा. मनुष्यवधास जबाबदार असणाऱयांसाठी रस्त्यावर उतरणारा सत्ताधारी पक्ष म्हणजे जगातले आठवे आश्चर्यच मानावे लागेल. नक्कीच त्यांच्या रक्तात आणि मेंदूत काहीतरी गडबड आहे!

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here