शिवसेनेचा भाजपला गंभीर इशारा; नाही तर अमेरिकेत ट्रम्प यांच्या बाबतीत घडले तेच…

मुंबई :

रिपब्लिकटीव्हीच्या अर्णब गोस्वामी यांना अटक झाली. त्यानंतर भाजपने जी भूमिका घेतली त्यातून जे वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला जात आहे, त्यावर आजच्या सामनाच्या अग्रलेखात भाष्य करत टीका करण्यात आली आहे.

नेमकं काय म्हटलं आहे सामनात :-

आणीबाणीसारखी परिस्थिती कोण निर्माण करीत आहेत व अराजक कुणाला हवे आहे ते आता स्पष्ट झाले आहे. पंतप्रधान मोदी यांच्या प्रतिमेचे आणि प्रतिष्ठेचे भंजन करण्याचे हे कारस्थान दिसत आहे. मनुष्यवधाच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या संशयित आरोपीचा निकाल रस्त्यावर उतरून कसा काय होऊ शकतो? गुजरातमध्ये गोध्राकांड व इतर प्रकरणांत अमित शहांपासून अनेक भाजप नेत्यांना तत्कालीन सरकारच्या कारवाईस सामोरे जावे लागले. या सर्व कारवाया सूडाच्याच होत्या असे शहा यांचे म्हणणे असले तरी त्यासाठी भाजपने रस्त्यावर उतरून आंदोलने केली नाहीत व कायद्याला आव्हान देण्याचा प्रयत्न केला नाही. न्यायालयीन डावपेचातून श्री. शहा सुटले आहेत. तेव्हा तर श्रीमान मोदी हेच गुजरातचे मुख्यमंत्री होते. त्यांनी तेव्हा संयम राखला, त्याचे फळ त्यांना मिळाले. आज सदोष मनुष्यवधप्रकरणी सरकारवर, ज्यांचा मृत्यू झाला त्या नाईक कुटुंबावर अश्लाघ्य चिखलफेक करणाऱ्या टोळ्य़ांनी याचे भान राखले नाही तर अमेरिकेत ट्रम्प यांच्या बाबतीत घडले त्याची पुनरावृत्ती हिंदुस्थानात घडायला वेळ लागणार नाही. भाजपवाल्यांचे डोके इतके कामातून गेले आहे की, दिल्लीच्या रस्त्यांवर श्री. उद्धव ठाकरे व इंदिरा गांधी यांची पोस्टर्स चिकटवून आणीबाणीची आठवण लोकांना करून दिली जात आहे. हा बालिशपणा तर आहेच, पण अज्ञानसुद्धा आहे. इंदिरा गांधींशी तुलना होणे ही गौरवाचीच बाब आहे. ‘हिंदुस्थान’च्या फाळणीचा सूड याच पोलादी स्त्रीने पाकिस्तानची फाळणी करून घेतला.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here