‘त्यावरून’ शिवसेनेचा भाजपला सणसणीत टोला; ‘हा’ तर मानसिक विकलांगतेचा तमाशाच

मुंबई :

रिपब्लिकटीव्हीच्या अर्णब गोस्वामी यांना अटक झाली. त्यानंतर भाजपने जी भूमिका घेतली त्यातून जे वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला जात आहे, त्यावर आजच्या सामनाच्या अग्रलेखात भाष्य करत टीका करण्यात आली आहे.

नेमकं काय म्हटलं आहे सामनात :-

आत्महत्येस प्रवृत्त करणे व त्यातून आत्महत्या घडणे हा एक प्रकारे सदोष मनुष्यवधासारखाच गुन्हा आहे. असा गुन्हा करणारी व्यक्ती लहान असो की मोठी, त्याच्यावर कायद्याने कारवाई व्हायलाच हवी, पण भारतीय जनता पक्षाला असे कायद्याचे राज्य मान्य नाही मुळात त्यांना कायदाच मान्य नाही असे भरकटलेले वर्तन ते करीत आहेत. महाराष्ट्रात 2018 साली एका माय-लेकरांनी आत्महत्या केली. तत्कालीन सरकारने ते प्रकरण दडपले. पोलिसांनी या प्रकरणातील एका आरोपीस पकडले व त्याच्या जामिनावर न्यायालयात सुनावणी सुरू असताना भाजपचे पुढारी वेडेखुळेच बनले. ते म्हणतात, जोपर्यंत सदोष मनुष्यवधातले ‘महात्मा’ सुटत नाहीत तोपर्यंत आम्ही सगळे दंडास काळय़ा फिती लावून काम करू. हा तर मानसिक विकलांगतेचा तमाशाच आहे.

नशीब की, याप्रश्नी भाजपने राज्यव्यापी जेल भरो, साखळी उपोषणे यांसारखे प्रयोग सुरू केलेले नाहीत. मनाने भरकटलेले प्रे. ट्रम्प अमेरिकेत जसे वागत आहेत तसेच ‘डिट्टो’ महाराष्ट्रातील भाजप पुढारी वागू लागले आहेत. अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प हे पराभूत होताना दिसत आहेत, पण ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये बसून दादागिरीची भाषा सुरू केली आहे. तद्दन खोटय़ा बातम्या पसरवून पदाची नाचक्की करत आहेत. कधी मतमोजणी थांबवा असा त्यांचा कांगावा असतो, तर कधी न्यायालयात जाऊन निर्णयास स्थगिती देण्याची मागणी करीत आहेत. ट्रम्प यांनीही त्यांच्या सशस्त्र्ा ‘रिपब्लिकन’ समर्थकांना रस्त्यांवर उतरवून गोंधळ आणि हिंसाचार सुरू केला आहे. ट्रम्प यांचे जे वर्तन आहे ते कायद्यास व अमेरिकेसारख्या राष्ट्राच्या प्रतिष्ठेस धरून नाही. तशीच अप्रतिष्ठा महाराष्ट्रातील विरोधी पक्षाकडून कायद्याच्या बाबतीत सुरू आहे.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here