असे बनवा चवदार ‘चिकन कॅफ्रिअल’; रेसिपी वाचा एका क्लिकवर

पदार्थांना जशी चव असते, सुगंध असतो, रुप असते तसेच पाय आणि पंखही असतात म्हणूनच ते लज्जतदार, चवदार पदार्थ सातासमुद्रापार पोहचतात. पोर्तुगीज वसाहतीतील अफ्रिकन सैनिकांनी बनविलेली चिकनची एक डिश. रंगाने हिरवी, इतकी चवदार की खाऊन झाल्यावरही अजून थोडंसं खावी, मसालेदार, जिभेवर रेंगाळणारी ही चव पोर्तुगीजांच्या जिभेवर स्वार होऊन गोव्यात येऊन पोहोचली. पोर्तुगीज त्यांच्या गावी परत गेले तरी ही डिश आजही गोव्यात येणाऱ्या पर्यटकांची मने जिंकते आहे. आणि त्यांच्या जिभेवर स्वार होत घराघरात पोहोचते आहे! ती डिश, अर्थात ‘चिकन कॅफ्रिअल’ कसे बनवायचे हे आज आपण सांगणार आहोत.

साहित्य घ्या मंडळीहो…

 1. 500 ग्राम चिकन
 2. 2 टेबलस्पून आले-लसूण पेस्ट
 3. 1/2 लिंबू
 4. 1 मोठा बटाटा (कापलेला)
 5. कॅफ्रिअल मसाला तयार करण्यासाठी :-
 6. 1 वाटी कोथिंबीर
 7. 3/4 वाटी पुदिना
 8. 6-7 हिरव्या मिरच्या
 9. 1 सिमला मिरची
 10. 2 टीस्पून धणे
 11. 1 टीस्पून जिरे
 12. 10-12 काळीमिरी
 13. 5-6 लवंग
 14. 1 इंच दालचिनीचे २ तुकडे
 15. 3 टेबलस्पून व्हाइट विनेगर
 16. 1 टिस्पून टोमॅटो केचप
 17. 1 कप गरम पाणी
 18. 1/2 टिस्पून साखर
 19. चवीनुसार मीठ

हे साहित्य घेतलं असेल वाट कसली बघताय लागा की बनवायला…

 1. प्रथम चिकन स्वच्छ धुवून त्याला लिंबू, आले लसूण पेस्ट व थोडे मीठ लावून 15 ते 20 मिनिटांसाठी मॅरीनेट करून घ्यावे. आता मिक्सरमध्ये पुदिना, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, भोपळी मिरची,धणे-जिरे, लवंग, काळीमिरी, दालचिनी आणि एक टेबलस्पून व्हिनेगर घालून चांगली स्मूथ पेस्ट करून घ्यावी. आपला कॅफ्रिअल मसाला तयार आहे.
 2. नंतर अर्धा मसाला चिकनला लावून तीन ते चार तास मॅरीनेट करावे आणि अर्धा मसाला बाजूला ठेवावा. त्यानंतर ते मॅरिनेटेड चिकन पॅनमध्ये घेऊन फ्राय करून घ्यावे.
 3. फ्राय केलेल्या चिकनमध्ये शिल्लक ठेवलेला अर्धा केफ्रिअल मसाला घालून एकजीव करून घ्यावा. त्यात बटाट्याचे तुकडे, एक कप गरम पाणी, दोन टेबलस्पून विनेगर, चवीप्रमाणे मीठ, अर्धा टी स्पून साखर आणि टोमॅटो केचप घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यावे.
 4. हे सगळे मिश्रण दहा ते पंधरा मिनिटे नीट शिजवून घ्यावे चिकन आणि बटाटा व्यवस्थित शिजल्यानंतर आपले चिकन कॅफ्रिअल खाण्यासाठी तय्यार…

संपादन : संचिता कदम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here