‘तर पुढच्या सात पिढ्या आपल्याला आशिर्वाद देतील’ म्हणत तांबेंनी केली ठाकरेंकडे ‘ही’ मागणी

मुंबई :

सध्या दिवाळीच्या पार्श्वभूमीवर धूर आणि आवाज करणारे फटके पर्यावरण आणि मानवाच्या आरोग्यास हानिकारक ठरणारे आहेत. सध्या आपण कोरोना या मोठ्या आरोग्याच्या संकटाला लढा देत आहोत. या काळात प्रदूषण झाले तर मोठ्या प्रमाणात रुग्णांची संख्या वाढू शकते. याच पार्श्वभूमीवर ‘मोठे आवाज़ करणाऱ्या व धूर करणाऱ्या फटाक्यांवर, प्लॅस्टिकवर ज्या पध्दतीने बंदी घातली, त्याप्रमाणे कायमस्वरुपी बंदी घाला’, अशी मागणी युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना केली आहे.

तांबे यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, आदित्य ठाकरे यांना विनंती आहे की, कृपया मोठे आवाज़ करणाऱ्या व धूर करणाऱ्या फटाक्यांवर, प्लॅस्टिकवर ज्या पध्दतीने बंदी घातली, त्याप्रमाणे कायमस्वरुपी बंदी घाला. पुढच्या येणाऱ्या सात पिढ्या आपल्याला आशिर्वाद देतील.

सत्यजित तांबे यांनी यापूर्वीही आपल्या भूमिका बेधडक मांडल्या आहेत. कधी कधी तर राज्य सरकारलाच घरचा आहेर देण्याचा प्रकारही त्यांनी केला आहे. थेट आणि जाहीरपणे आपल्या मागण्या, भूमिका आणि प्रस्ताव तांबे सरकारसमोर मांडत असतात. दरम्यान, कोरोनामुळे यंदाची दिवाळी फटाकेमुक्त असावी असा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा प्रयत्न आहे. हिवाळ्यात आधीच प्रदुषणात वाढ होते. त्यात फटाक्यामुळे जास्त प्रदुषण होण्याची शक्यता आहे. दिवाळीनंतरच दुसऱ्या लाटेची शक्यताही तज्ज्ञांनी व्यक्त केल्याने राज्य सरकार सावध झालं आहे.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here