कोहली, गांगुली यांच्याविरोधात तक्रार दाखल; वाचा, काय आहे प्रकरण

मदुराई :

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली, बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली तसेच अन्य काही कलाकारांच्या विरोधात मद्रास न्यायालयात याचिका तसेच तक्रार दाखल करण्यात आली आहे. ज्या सेलेब्रिटींच्या विरोधात ही तक्रार दाखल झाली आहे, अशा सर्वच सेलिब्रेटींकडून न्यायालयाने स्पष्टीकरण मागवले आहे.

ऑनलाइन जुगाराची जाहिरातबाजी केल्याप्रकरणी ही तक्रार दाखल करण्यात आली असून विराट कोहली, सौरव गांगुली तसेच अभिनेते प्रकाश राज, अभिनेत्री तमन्ना भाटिया, अभिनेता राणा डग्गुबुट्टी यांच्याकडूनही न्यायालयाने स्पष्टीकरण मागवले आहे. या सगळ्या सेलेब्रिटी मंडळींना न्यायालयाने नोटीस बजावली आहे. ऑनलाइन गॅम्बलिंग ऍपची जाहिरात करून त्याला प्रोत्साहन दिल्याचा या सगळ्यांवर आरोप करण्यात आला आहे. या याचिकेवर मद्रास उच्च न्यायालयात सुनावणी झाली.

काय आहे याचिका :-

सेलेब्रिटी असणाऱ्या मोठ्या व्यक्तींचा सामान्य जनतेवर प्रभाव असतो. या व्यक्तींनी ऑनलाइन ऍपच्या केलेल्या जाहिरातीमुळे जुगाराला प्रोत्साहन मिळत आहे. तसेच लोकांसमोर चुकीचा संदेश जात आहे. सेलिब्रीटींनी कोणत्याही गोष्टीची जाहिरात केली तर त्याचा अनेकांवर प्रभावही पडतो त्यामुळे या चुकीच्या गोष्टींना प्रोत्साहनही मिळते.

या सेलिब्रीटींसह उच्च न्यायालयाने केंद्र व राज्य सरकारलाही स्पष्टीकरण देण्याचे आदेश दिले आहेत. येत्या 19 नोव्हेंबरला याबाबत सुनावणी होणार आहे. या सर्वांना अटक करण्याची मागणीही या याचिकेत करण्यात आली आहे.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here