फेक जॉब पोर्टल्सने महिनाभरात 27 हजार लोकांना मूर्ख बनवत लुबाडले ‘इतके’ कोटी; वाचा, काय आहे प्रकरण

दिल्ली :

देशात बेरोजगारांची कमी नाही आणि अशा बेरोजगारांना नोकरी देण्याच्या आमिषाने फसवणाऱ्याचीही कमी नाही. फसवणारी चोरटी-भामटी मंडळी विविध पद्धतीने फसवतात. आजकाल जग डिजिटल झालं आहे त्यामुळे डिजिटल चोरी करणाऱ्याच प्रमाणही वाढलं आहे. अशातच एक मोठं प्रकरण समोर आलं आहे. बेरोजगार तरूणांना नोकरीचे अमिष दाखवून त्यांच्याकडून पैसे लुबाडणारी एक दिल्लीतील टोळी पोलिसांनी पकडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या टोळीने तब्बल 27,000 लोकांना फसवून नोंदणी शुल्काच्या नावाखाली लोकांकडून 1.09 कोटी रूपये लुबाडले आहेत.

या सर्व घटनेत सर्वात महत्वाची बाब म्हणजे हे नोकरीचे रॅकेट केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या नावावर चालवले जात होते. यात फसवल्या गेलेल्या लोकांची संख्या बघता ही भारतातील सर्वात मोठी फसवणूक असू शकते, असा अंदाज आहे.

सरकारी आणि खासगी एजन्सीसाठी ऑनलाइन भरती आयोजित करणार्‍या मास्टरमाईंड पोर्टलने कायदेशीररित्या एक सेंटर सुरू केले होते, यासाठी त्यांच्याकडे नोकरी हवी असलेल्यांचा वैयक्तिक डेटासुद्धा पोहचत होता, ज्यांना त्यांनी नोकरीचे अमिष दाखवण्यासाठी मॅसेज पाठवले होते. एका महिन्यात, टोळीने कथित प्रकारे 13,000 व्हॅकन्सीसाठी नोंदणी करण्यासाठी फसवणूक करण्यासाठीच्या वेबसाइटच्या लिंकसह 15 लाख एसएमएस पाठवले, ज्यामध्ये अकाऊंटंट, डेटा एंट्री ऑपरेटर, नर्सिंग, आया आणि अ‍ॅम्ब्युलन्स ड्रायव्हरसारख्या पदांचा समावेश होता, अशी माहिती पोलिसांनी या प्रकरणाबाबत बोलताना दिली.

या वेबसाइट इतक्या हुबेहुब डिझाइन केल्या होत्या की काही वृत्त आणि नोकरी पोर्टल्सचे म्हणणे होते की, त्या खर्‍या आहेत. रॉय यांनी म्हटले की, लोकांना गंडा घालण्यासाठी टोळी दोन वेबसाइट चालवत होती – www.sajks.org आणि www.sajks.com. दोन्हींचा दावा होता की, त्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयांतर्गत आहेत, अशी माहिती सायबर सेलचे पोलीस उपायुक्त, अनीश रॉय यांनी या बनावट नोकर्‍यांबबात दिली.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here