पोल्ट्रीतील कोंबड्यांला हिवाळ्यात जडतात सर्वात जास्त रोग; वाचा, कशी करावी रोग नियंत्रणासाठी उपाययोजना

जसा हवामान आणि ऋतूतील बदलांचा परिणाम पोल्ट्रीतील कोंबड्यांवर होत असतो. इतर प्राण्यांच्या तुलनेत कोंबड्या विविध रोगांना, आजारांना लवकर बळी पडतात. त्यामुळे जसजसा ऋतू बदलतो तसतशी कोंबड्यांची काळजी घेणे गरजेचे आहे. आता गारठा जाणवू लागला आहे त्यामुळे कोंबड्यांची या ऋतुमध्ये विशेष काळजी घेऊन व्यवस्थापनामध्ये योग्य ते बदल करावा लागेल.

बहुतांश वेळा गारठ्याच्या दिवसांमध्ये अंडी उत्पादनात घट पाहायला मिळते हा वातावरणातील बदलाचा परिणाम असतो. अतिथंडीमध्ये कोंबड्यांवर अतिताण येतो. त्यामुळे उत्पादनात घट होऊन पक्षांची रोगप्रतिकारशक्ती कमी होते व अंडी उत्पादनात घट येते.

असे उद्भवतात रोग :-

अतिथंडी व शेडमधील ओलसरपणामुळे शेडमध्ये रोगकारक जिवाणू परजिवींची संख्या वाढते व या जिवाणू आणि परजिवींशी संपर्क येऊन कोंबड्यामध्ये रोग उद्भवतात व मोठ्या प्रमाणात नुकसान होते.

अशी असतात लक्षणे :-

कोंबड्यामध्ये हिवाळ्यातील आजारांमध्ये मुख्यतः श्वसनास त्रास होणे, तणावाखाली असणे, नैराश्य असणे,हगवण, खाद्य न खाणे, विखुरलेले पंख,सुजलेला चेहरा व पाय पुढे घेऊन पडून राहणे यासारखी लक्षणे आढळतात.     

अशी घ्यावी काळजी :-

  1. हिवाळ्यामध्ये शरीर खाद्यावरील खर्च जास्त होतो तसेच ऊर्जा तयार करण्यासाठी न लागणारी पोषणतत्वे वाया जातात. म्हणून खाद्यावरील खर्च कमी करण्यासाठी व खाद्याचा अपव्यय टाळण्यासाठी ऊर्जायुक्त खाद्य पदार्थ जसे तेल, स्निग्ध पदार्थ, प्रथिने यांचे खाद्यातील प्रमाण वाढवावे व इतर पोषणतत्त्वांचे प्रमाण तितकेच ठेवावे.
  2. शेडमध्ये दोन्ही बाजूच्या जाळ्यांना पडदे लावावेत. हे पडदे रात्री व पहाटे थंड हवेच्या वेळी बंद करावेत. दुपारी थोडी उष्णता असते त्यावेळी पडदे उघडावेत.
  3. शेडमधील तापमान विजेचे बल्ब, शेगडी किंवा बुडरच्या साहाय्याने वाढवावे.
  4. लोडशेंडींगच्या काळात शेडमधील तापमान वाढविण्याकरिता तातडीची सुविधा म्हणून जनरेटर, बॅटरीची सोय करावी.
  5. मुक्त शेडमध्ये कोंबड्यांना पूरक खाद्य द्यावे. जेणेकरून पोषणतत्वांची कमतरता होणार नाही.
  6. पक्षांना पिण्यासाठी कोमट पाणी उपलब्ध करून द्यावे. जेणेकरून खाद्य खाण्याचे प्रमाण वाढून कोंबड्यांच्या शरीरातील ऊर्जा टिकवण्यास मदत होते.
  7. ब-याचवेळा शेडमध्ये पाणी सांडून गादी साहित्य ओले झाल्यास व शेडमधील आर्द्रता वाढल्यास गादी साहित्यामध्ये जंताची अंडी तयार प्रत्येक तीन महिन्याला जंतनिर्मूलन करणे फायदेशीर ठरते तसेच गादी साहित्य नेहमी कोरडे ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत.
  8. कोंबड्यासाठी शेड तयार करताना कोंबड्यांचे प्रत्येक ऋतुमध्ये योग्य व्यवस्थापन करता येईल, असे नियोजनपुर्वक शेड तयार करावे. तसेच शेडमध्ये हवा खेळती राहील याचीही काळजी घ्यावी.
  9. ठरवून दिल्याप्रमाणे कोंबड्यांना नियमित लसीकरण करून घ्यावे. अधिक माहितीसाठी जवळच्या पशुवैद्यकाशी संपर्क करावा.
  10. ज्या ज्या वेळी हवामानात अचानक बदल होऊन पक्षांवर ताण येतो, त्यावेळी पक्षांच्या आहारात इलेक्ट्रोलाईटस व ‘ब’ जीवनसत्वाचा वापर करावा, जेणेकरुन पक्षावरील ताण कमी होईल.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here