‘त्यांना’ वाचवण्यासाठी एका मराठी कुटुंबाची ढाल केली; ‘या’ भाजप नेत्याचा गंभीर आरोप

मुंबई :

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात थेट सूसाईड नोटमध्ये नाव असणाऱ्या ‘रिपब्लिक टीव्ही’च्या अर्णब गोस्वामी यांना काल सकाळी अटक करण्यात आली. यावरून भाजपने आक्रमक भूमिका घेत माध्यमांची गळचेपी केली जात असल्याचे म्हटले. याच पार्श्वभूमीवर आज भाजप नेते व आमदार आशिष शेलार यांनी गंभीर आरोप केला आहे. ‘अन्वय नाईक यांना न्याय मिळायलाच हवा, पण एक मराठी कुटुंब उभे करुन तुम्ही रिया चक्रवर्तीला का वाचवताय? एका मराठी कुटुंबाची ढाल करुन “दिशा सालीयन” बाबत बोलणाऱ्यांची तोंड का बंद करताय?’, असा सवालही शेलार यांनी केला आहे.

पुढे शेलार यांनी म्हटले आहे की, त्यावेळी आमच्या महाराष्ट्र पोलीसांनी केलेला तपास आणि संपूर्ण पोलीस दल यांना खोटे ठरवून आता एका “सिंह” यांना “परमवीर” का देताय? खरी नौटंकी तर हीच आहे.

‘एका “युवराजला” वाचवायला महाराष्ट्रालाच का खोटे ठरवताय?’, असा सवाल उपस्थित करत ‘पत्रपंडित हो, अग्रलेखाच्या शाईचे डाग तुमच्या सदऱ्यावर दिसू लागलेत’, असा टोलाही शेलार यांनी हाणला आहे. यावेळी शेलार यांनी मंत्री आदित्य ठाकरे, शिवसेना नेते व सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांचे नाव न घेता सुनावले आहे.

दरम्यान भाजप आमदार राम कदम यांनीही या विषयावरून राज्यपाल भगतसिंह कोशारी यांची भेट घेतली आहे.  

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here