शिवसेनेचा खडा सवाल; मुडदे पाडले गेले ‘तेव्हा’ कोणाला आणीबाणीची आठवण का झाली नाही?

मुंबई :

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात थेट सूसाईड नोटमध्ये नाव असणाऱ्या ‘रिपब्लिक टीव्ही’च्या अर्णब गोस्वामी यांना काल सकाळी अटक करण्यात आली. त्यानंतर राज्यातील आणि देशातील भाजप नेत्यांनी केलेल्या गदारोळावर शिवसेनचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखात भाष्य करण्यात आले आहे.

वाचा, नेमकं काय म्हटलं आहे सामनात :-

महाराष्ट्रात आणीबाणीसदृश परिस्थिती निर्माण झाल्याची आवई भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्रातील लोकांनी उठवली आहे. त्यांच्या जोडीला दिल्ली सरकारमधील अनुभवी शहाणेही सामील व्हावेत हे आश्चर्यच आहे. कधीकाळी ‘काँग्रेस’ गवत हे अगदी निरुपयोगी उत्पादन म्हटले जात असे. ते केवळ निरुपयोगीच नव्हे तर चांगलेच उपद्रवी असल्याचे मत तेव्हाच्या राजकीय विरोधकांकडून व्यक्त केले जात होते. त्याच गवताचा काढा करून सध्याचे भाजपवाले दिवसातून दोन वेळा पीत असावेत असे त्यांचे वर्तन आहे. मुंबईतील एका वृत्तवाहिनीचा मालक, संपादक असलेल्या अर्णब गोस्वामी यास एका अत्यंत खासगी प्रकरणात अटक झाली. त्याच्या अटकेचा राजकारणाशी, पत्रकारितेशी संबंध नाही. श्री. गोस्वामी यांनी टिळक-आगरकरांप्रमाणे सरकारविरोधात जहाल लिखाण केले. त्यामुळे सरकारने त्यांची गचांडी पकडली असे काही हे प्रकरण नाही. दोन वर्षांपूर्वी अलिबाग निवासी अन्वय नाईक व त्यांच्या आईच्या आत्महत्येशी संबंधित ही अटक आहे. नाईक यांनी मृत्यूपूर्वी जे पत्र लिहिलं त्यात गोस्वामी यांच्याशी झालेल्या आर्थिक व्यवहाराचा, फसवणुकीचा संदर्भ आहे. त्याच तणावातून नाईक व त्यांच्या आईने आत्महत्या केली. पण आधीच्या सरकारने गोस्वामी यांना वाचवण्यासाठी हे सर्व प्रकरण दडपले. त्यासाठी पोलीस व न्यायालयावर दबाव आणला. आपल्या पतीच्या मृत्यूची नव्याने चौकशी करावी असा अर्ज नाईक यांच्या पत्नीने पोलीस व न्यायालयासमोर केल्यावर

कायद्याने जे व्हायचे तेच

झाले आहे. गोस्वामी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. आता चौकशीत काय ते सत्य बाहेर येईल. यात ‘आणीबाणी’ आली, काळा दिवस उजाडला, पत्रकारितेवर हल्ला झाला, असे काय आहे? अर्णब गोस्वामी व त्यांची वृत्तवाहिनी कोणत्या प्रकारची पत्रकारिता करते? व त्यांच्या बरळण्यामागे कोणाची फूस आहे हे जगजाहीर आहे. सोप्या भाषेत ज्यास सुपारी पत्रकारिता म्हणावे तोच प्रकार आहे. गोस्वामी यांनी महाराष्ट्र सरकार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व इतर प्रमुख नेत्यांच्याबाबत गरळ ओकली म्हणून त्यास अटक झालेली नाही. त्याचा संबंध एका मृत्यू प्रकरणाशी जोडला आहे व मृताच्या पत्नीच्या तक्रारीवरून ही कारवाई आहे. त्यामुळे गृहमंत्री अमित शहा यांनी जाहीर केल्याप्रमाणे ही अटक म्हणजे लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर हल्ला वगैरे अजिबात नाही. गुजरातमध्ये सरकारविरोधी लिहिणाऱया संपादकांना अटका झाल्या आहेत. उत्तर प्रदेशात पत्रकारांचे मुडदे पाडले गेले तेव्हा कोणाला आणीबाणीची आठवण का झाली नाही?

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here