अर्णवप्रकरणी मराठी पत्रकारांनी घेतली ‘ही’ भूमिका; पहा काय म्हटलेय परिषदेने

रिपब्लिक टीव्हीचे सर्वेसर्वा आणि आपल्या वेगळ्या स्टाईलने टीव्हीवर आवाज वाढवत बोलण्याच्या पद्धतीमुळे प्रसिद्ध असलेल्या अर्णव गोस्वामी यांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. त्यावर भाजपने ही राजकीय स्वरुपाची अटक असल्याचे म्हटले आहे. तर मराठी पत्रकार परिषद आणि पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती यांनी हे कायदेशीर असून त्यात पत्रकारितेचा काहीही संबंध नसल्याचे म्हटले आहे.

याबाबत अध्यक्ष एस. एम. देशमुख यांनी फेसबुकवर लिहिले आहे की, रिपब्लिक टीव्ही चे संपादक अर्नब गोस्वामी यांच्या अटकेचा निषेध यासाठी करता येणार नाही की, हे प्रकरण व्यक्तीगत आहे.. त्याचा पत्रकारितेशी दुरान्वयाने संबंध नाही..त्यामुळे अर्नब यांची अटक म्हणजे चौथ्या स्तंभावरचा हल्ला वगैरे म्हणत कोणी गळे काढण्याची गरज नाही..

त्यांनी पुढे लिहिले आहे की, मे 2018 मध्ये अलिबाग तालुक्यातील कावीर येथील वास्तूविषारद अन्वय नाईक आणि त्यांच्या मातोश्री कुमूद नाईक यांनी आत्महत्या केली होती.. अर्नब गोस्वामी यांच्याकडून कामाची मोठी रक्कम येणे होती पण ती ते देत नसल्याने ही आत्महत्या झाल्याचे तेव्हा सांगण्यात येत होते.. गोस्वामी यांच्या विरोधात तेव्हा अलिबाग पोलिसांनी गुन्हाही दाखल केला होता पण पुढे कोणतीच कारवाई झाली नव्हती.. त्यामुळे नाईक कुटुंबियांनी या प़करणाची सीआयडी मार्फत चौकशी करावी अशी मागणी केली होती.. त्यानुसार गृहमंत्री अनिल देशमुख यांनी हे प़करण सीआयडीकडे वर्ग करण्याचे आदेश दिले होते.. त्यानुसार अलिबाग गुन्हा अन्वेषण विभागाने नव्याने चौकशी करून आज गोस्वामी यांना अटक केली..या विषयाचा पत्रकारितेशी दुरान्वयाने देखील संबंध नाही.. दोघांच्या मृत्यूचा हा विषय असल्याने या अटकेचा निषेध उचित ठरणार नाही.. पत्रकारितेची झुल पांघरूण वाट्टेल तसे उद्योग करणारयांची पाठराखण मराठी पत्रकार परिषद आणि पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती करू शकत नाही.. कायद्याला त्याचे काम करू द्यावे हेच उचित ठरेल..

अर्नब गोस्वामी यांनी पत्रकारितेचे सर्व संकेत पायदळी तुडवले असून पत्रकारिता कशी नसावी याचा नवा आदर्श जगासमोर ठेवला आहे.. त्यांची पत्रकारिता समर्थनीय नाही असे आम्हाला वाटते, असा समारोप देशमुख यांनी केली आहे.

संपादन : सचिन मोहन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here