‘या’ मराठी नेत्यांकडूनही झाल्या होत्या हिंदी बोलताना गमतीदार चुका; वाचा भन्नाट किस्से

मराठी माणूस हिंदी बोलेगा तो चुका तर होयेगाच ना… तुमच्या माझ्यासारख्या मराठी माणसाची हिंदी जेमतेम असते. त्यातच माणूस जर मातृभाषा जास्त काळ बोलत असेल, तर इतर भाषेत बोलताना मातृभाषेतील शब्द आपोआप येतात. आणि त्यानंतर घडतात त्या गमती-जमती. आणि त्या गमती जमतीचे नंतर तिखट मीठ लावून किस्स्यात रुपांतर केले जाते. महाराष्ट्रातील अनेक बड्या नेत्यांकडून अशा गमतीशीर चुका झालेल्या आहेत. महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर आधी खेळीमेळीचे वातावरण असायचे. हसी-मजाक केली जायची. सगळे चेष्टेत व्हायचे. अर्थात महाराष्ट्राकडून हिंदी बोलताना झालेल्या चुका दिल्लीनेही गमतीदारपणे घेतल्या हे महत्वाचे … वाचा हे भन्नाट किस्से

  • आदरणीय दिवंगत आर.आर.पाटील यांची माफी मागून तुम्हाला त्यांचा पहिला भन्नाट किस्सा सांगतो. आर आर पाटील म्हणजे आबा अगदी शांत, साधे आणि प्रांजल व्यक्तिमत्व होते. त्यांच्या साधेपणामुळे आणि प्रामाणिकपणामुळे आबा राज्याचे गृहमंत्री झाले. तरीही आबांचा स्वभाव आणि राहणी अगदी आधीसारखीच राहिली. याच आबांच्या साधेपणामुळे गडबडीत एक किस्सा जन्माला आला.

२००६-२००७ मध्ये पोलिसांनी एका अट्टल गुन्हेगाराला पकडले. त्यावेळी आबा गृहमंत्री होते. तेव्हा एका हिंदी वृत्तवाहिनीच्या पत्रकाराने हिंदीमध्ये “इस मामले में सरकार आज क्या करेगी ?” असा प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना आबा म्हणाले, “उन्हे शिक्षा मिले इसलिये हम पुरा प्रयास करेंगे.” परंतु तुम्ही वापरलेला शिक्षा शब्द मराठी असून हिंदीत त्याचा अर्थ शिक्षण असा होतो हे निदर्शनास आणून देताच आबांनी पुन्हा नवी बाईट देऊन “सजा” असा शब्द वापरला.

  • सलग तीन वेळा बीडच्या खासदार राहिलेल्या केशरकाकू क्षीरसागर यांची माफी मागून त्यांच्यात आणि दिवंगत इंदिरा गांधीत घडलेला एक भन्नाट किस्सा सांगतो. केशरकाकू आणि इंदिरा गांधी यांचा आपापल्या कार्यकाळात आणि आपापल्या कार्यक्षेत्रात मोठा दबदबा राहिला.

खासदार असताना एका कारणाने त्या इंदिरा गांधींना भेटायला गेल्या होत्या. तेव्हा इंदिरा गांधींनी टेबलवर पेन्सिल आपटत तिथल्या शिपायावर रागवत असतानाचे दृश्य त्यांनी पाहिले.

काकू परत जायला निघाल्या, पण इंदिराजींनी त्यांना हाक मारुन बोलावून घेतले आणि विचारले, “केशरबाई आप वापस क्यू लाट रही है ?” त्यावर काकू बोलल्या, “आपने टेबलपर पेन्सिल आपटी तो मुझे लगा आपसे इस वक्त बात करना उचित नही” त्यांच्या आपटी शब्दाचा अर्थ इंदिराजींना समजला नाही. केशरकाकूंकडून बोलताना चुकून मराठी शब्द गेला आणि त्याचा अर्थ समजल्यावर इंदिराजी खळखळून हसल्या.

  • १९९८ मध्ये भाजपचे सरकार स्थापन झाले होते. त्यांच्या विश्वासदर्शक प्रस्तावावर चर्चा चालू होती. शिवसेनेच्या वतीने खासदार मोहन रावलेंनी प्रस्तावावर बोलायला सुरुवात केली, “दोन वर्षांपूर्वीच्या विश्वासदर्शक ठरवत वाजपेयी सरकारला बहुमत मिळत नसल्याचे दिसताच अटलबिहारी वाजपेयीनीं घोषणा केली होती, मै जा राहा हूं राष्ट्रपतीजी के पास अपना त्यागपत्र देने.अटलजी कि यह बात सुनकर महाराष्ट्र के लागों के आँखो में पानी आ गया.” आंसू म्हणण्याऐवजी पानी म्हटल्याने विरोधी बाकांवरील सदस्यांमध्ये एकच हशा पिकला.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here