‘तेव्हा’ बांगड्या फोडू नका; ‘या’ भाजप नेत्याची जहरी टीका

मुंबई :

टीआरपी घोटाळ्यामुळे चर्चेत असलेल्या रिपब्लिक टीव्हीचे एडिटर इन चीफ अर्णव गोस्वामी याना २०१८ मध्ये घडलेल्या एका घटनेमुळे राहत्या घरातून सकाळी आठच्या सुमारास अटक करण्यात आल्याचे समजते. त्यांना मुंबई गुन्हे अन्वेषण विभागाच्या कार्यालयात नेण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते अतुल भातखळकर यांनी मविआ सरकारवर नाव न घेता निशाणा साधला. ते म्हणाले की, न्याय नीती सोडून अभिमन्यूला चक्रव्यूहात घेरणाऱ्यांनो तयार रहा… भीमाची गदा निश्चित हिशोब चुकते करेल, जेव्हा कुरुक्षेत्रात मांड्या फुटतील तेव्हा बांगड्या फोडू नका.

पुढे भातखळकर यांनी सुप्रिया सुळेंनी केलेल्या ‘देशातील आणीबाणी’च्या विधानावरूनही मविआ सरकारवर टीका केली. भातखळकर म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे देशात आणीबाणी असल्याचे सुप्रिया सुळे काल म्हणाल्या. ही आणीबाणी खरेतर राज्यात उद्धव ठाकरे यांच्या सूडबुद्धी कारभारामुळे सुरू आहे. अर्णब गोस्वामीना झालेली अटक ही लोकशाहीला काळिमा फासणारी घटना आहे. यापुढे भकास आघाडीने लोकशाहीच्या गप्पा मारू नये.

दरम्यान आशिष शेलार यांनीही ‘ एका प्रकरणात राज्य सरकारला उघडे पाडले म्हणून पत्रकार राहुल कुलकर्णीला अटक… सरकार विरोधात सोशल मिडियावर बोलणाऱ्या निवृत्त नेव्ही अधिकाऱ्यांसह सामान्य माणसाला ठेचून काढणे नित्याचेच झाले… आता सरकारला खडा सवाल विचारणाऱ्या संपादकाच्या हातात बेड्या… वा रे वा लोकशाही सरकार!’, असे म्हणत टीका केली.    

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here