करोनाच्या संकटाने आपल्याला नेमके काय शिकवले; वाचा काय आहे सगळीकडे परिस्थिती

करोना म्हणा किंवा कोरोना म्हणा. या नावाचा एक भयंकर वाटणारा विषाणू आला आणि जगामध्ये अनेक बदल होतील अशी अपेक्षा निर्माण झाली. त्या घटनेला आता सात-आठ महिने उलटून गेली. आपल्यात म्हणजे एकूण सामाजिक परिस्थितीत, आपल्या राहणीमानात आणि घर-कार्यालयात खरच यामुळे काहीही बदल झालाय का? नाहीच ना.. होय, नाहीच. फ़क़्त आपण भीतीखाली जगतोय. कारण, ना आपल्याकडील स्वच्छतेचा अग्रक्रम बदललाय.. ना आपण आरोग्यदायी जगण्यासाठी चांगले-चुंगले असे जीवनसत्व घटकायुक्त खाद्य खातोय.

ही अशी विदारक आणि केविलवाणी वाटणारी परिस्थिती काही फ़क़्त महाराष्ट्र राज्यात, भारत देशात किंवा आशियाई देशात नाही. अवघ्या जगभरातील कोडग्या माणसांना करोनाचे संकट येऊनही काहीच फरक पडलेला नाही. अगोदर भीतीच्या सावटाखाली लॉकडाऊन झालेले हेच महाभाग आता जुन्याच स्टाईलने आपले जीवन जगत आहेत. आताही कुठेही बाहेर पडा. सगळीकडे आपल्याला पिचकारी बहाद्दर हमखास भेटतात. अगदी आपल्या घराच्या भोवती गुटखा-मावा खाऊन रंगरंगोटी करणारे हे महाभाग आताही असेच थैमान घालीत आहेत. त्यांच्यावर वाचक बसवायला अजूनही प्रशानासन नावाच्या कोडग्या आणि निबर यंत्रणेला अजिबात यश आलेले नाही.

सामान्य माणसाने हेल्मेटच्या आत मास्क घातला नाही म्हणून पावत्या फाडीत फिरणारे पोलीस आणि महापालिका यंत्रणा राजरोस चालू असलेल्या थुंकीच्या टपऱ्यांवर काहीच कारवाई करीत नाहीत. कारण, आहे अर्थकारण नावाच्या गोष्टीत. हे तर खूप लांबचे झाले. आपल्याला स्वच्छता नावाची गोष्ट तरी या करोना विषाणूने शिकवली का? होय, त्याने शिकवण्याचा प्रयत्न केला. पण आपल्याला काही ते पचनी पडले नाही. आपण अस्वच्छता पसरवित राजरोस फिरत आहोत. कारण, तो आपलाच खऱ्या अर्थाने धर्म आहे की.

मास्क लावा, हात धुवा आणि सगळीकडे पचापच थुंकत बिनदिक्कत फिरा असाच छुपा संदेश आपण सगळ्यांनी घेतला आहे. आताही असे थुंकीबहाद्दर राजरोस फिरत असताना प्रशासनाला आणि समाजाला त्याचे काहीच वावडे वाटत नाही. महाराष्ट्रात गुटखा आणि सुगंधी सुपारी यांची बंदी असतानाही हे घडत आहे. कारण, समाज म्हणून आपणही प्रशासनाच्या पेक्षा अधिक कोडगे झालेलो आहोत.

वाचक मित्र-मैत्रिणींनो, विचार करा की यापूर्वीही आपल्या भागात आणि सरकारी कार्यालयात अस्वच्छता होतीच की नाही? त्याने रोगराई पसरत होतीच की नाही? करोना आल्यावर अस्वच्छता आणि एकमेकांच्या संपर्कातून आजार कसे पसरतात याची माहिती आपल्याला पुन्हा एकदा खऱ्या अर्थाने मिळाली की नाही? याची उत्तर होय असतील तर मग आता सात महिन्यांनी आपण मास्क लावून फिरताना किंवा हात साफ ठेवताना सामाजिकदृष्ट्या ज्या आजार पसरवणाऱ्या जागा आहेत तिकडे स्वच्छता आणली आहे का?

याचे उत्तर जर होय असेल तर हा लेख एकदम बोगस आहे. मात्र, जर याचे उत्तर नकारात्मक असेल असेल तर मग आपण किती दिवस माणूस नसल्याचे सिद्ध करणार आहोत. कोविड १९ नावाचा आजार पसरत असताना आपल्याकडे देशभरात लॉकडाऊन हे अजस्त्र असे अस्त्र परजण्यात आले. त्यावेळी सगळे काही वरतून येत असल्याने स्थानिक पातळीवर काहीच नियोजन न करता प्रशासनाने फ़क़्त माणसांना हाणमार करणे आणि दंड वसुली करणे यावर फोकस केला. परिणामी जनतेला वाटले की आता करोना नावाचा भयानक विषाणू एकाच दिवसात लॉकडाऊन होणार. मास्टरस्ट्रोक मारण्याच्या नादात मग हा आजार वेगाने पसरला. अनेकांच्या घरातील ससुख आणि समाधान यात स्वाहा झाले. त्याला सात महिने उलटून गेल्यावरही आपण तसेच मोकाट जगात आहोत. कारण, सामाजिक भान नावाची गोष्ट आपण विसरलो आहोत.

अजूनही काहीच बिघडले नाही. सुदैवाने करोनाच्या मृत्यूचे प्रमाण आता कमी होत आहे. मात्र भविष्यात असे काहीतरी आणखी भीषण सनात येणारच नाही असे काहीही नाही. त्यामुळे अशावेळी आपण सर्वांनी आता सुधारायला पाहिजे. फ़क़्त मास्क लावून आणि हात धूत फिरल्याने विषाणूंचे किंवा आजारांचे संक्रमण रोखले जाणार नाही. त्यासाठी एसटी बसस्थानक आणि सगळीकडच्या सार्वजनिक स्वच्छतागृहात स्वच्छता पाळावी लागेल. पेट्रोल पंप आणि हॉटेल यामध्ये स्वच्छ टोयलेट हा आपला सर्वांचा अधिकार आणि गरज आहे. त्यामुळे आतातरी सुधारा. कचरा कुठेही फेकू नका आणि स्वच्छतेचा आग्रह धरा.. नाहीतरी आपले अस्वच्छ भारत मिशन आहेच की जोमात चालू..!

संपादन : सचिन मोहन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here