म्हणून परवानगी नसतानाही गोव्यात बिनधास्त चालतात कसिनो हाऊस..!

आपले भारतीय लोक फारच जुगाडू आणि शब्दश: अर्थ घेणारे आहेत. आज एका कायद्याचा शब्दशः अर्थ घेतल्यामुळे कोट्यावधी रुपयांचा जुगार बिनदिक्कत चालू आहे. अगदी स्वतः सरकारही त्याला थांबवू शकत नाही. भारतात गोवा आणि ईतर मोजक्या राज्यात कसिनो यासारखा पैशेवाला खेळ खेळला जातो. सिक्कीम आणि दमण आणि दीव केंद्रशासित प्रदेश ही भारतातील अशीच ठिकाणे आहेत जिथे आपण कायदेशीररित्या कॅसिनो गेम खेळू शकता.

काही व्यावसायिक आणि पर्यटनाचे फायदे बघून गोव्यात मात्र, काही ठिकाणी कसिनो गेम खेळण्यास काही वर्षांपूर्वी परवानगी देण्यात आली. असे असले तरीही गोव्याच्या आसपास असणाऱ्या नद्यांवर असणाऱ्या जहाजांमध्ये हा गेम खेळला जातो. मात्र, एक काळ होता जेव्हा आपल्या या भारत देशाच्या भूभागावर कसिनो खेळण्यास कायदेशीर परवानगी नव्हती. तेव्हाही हे गेम लपून-छपून खेळले जायचे. जसे आज गुटखा, मावा खाण्यास बंदी असली तरी सर्रास हे पदार्थ बनवले, विकले आणि खाल्ले जातात. याच पद्धतीने कसिनोही खेळला जायचा.

आधी कसिनोविषयी बेसिक माहिती जाणून घेऊया. २ प्रकारचे कसिनो असतात. यात विशेष काही फरक नाही. फक्त कसिनो गेम खेळताना आपण उभे कुठे आहोत हे महत्वाचे आहे. म्हणजे आपण जमिनीवर उभे आहोत की जहाजावर, हे महत्वाचे आहे. पहिले येतात ते जमीन-आधारित कॅसिनो आणि दुसरे म्हणजे शिप कॅसिनो. ज्याला ऑफशोअर असेही म्हटले जाते. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काही वर्षांनी केंद्र सरकारने जुगारासारख्या खेळावर बंदी आणली होती. यातच कसिनोही येतो. परंतु, भारतीय लोक फारच जुगाडू होते.

भारत सरकारच्या नियमानुसार भारतीय भूमीवर कुठेच जुगार तसेच कसिनो खेळण्याची परवानगी नव्हती. मग गोव्यातल्या काही हुशार लोकांनी सरकारचे नियम शब्दशः पाळले. जमिनीवर परवानगी नाही ना मग आम्ही पाण्यावर कसिनो उभा करू, असे म्हणत कसिनो चालवणाऱ्या लोकांनी अक्षरशः जहाजे विकत घेतली. काहींनी जहाजमालकांशी करार केले आणि जहाजावर कसिनो सुरु झाले. आजही भारतासह जगभरात कसिनो हे जहाजावरच आढळून येतात.

पुढे काही वर्षांनी केंद्र सरकारने गोवा सरकारच्या विनंतीनुसार कसिनोचे नियम शिथिल केले. त्यात काही बदल केले. परिणामी गोव्याच्या जमिनीवरही कसिनो खेळण्यास परवानगी मिळाली. मात्र, आता परवानगी मिळाली असली तरी आजही गोव्यात काही उत्तम कॅसिनो मंडोवी नदीच्या बाजूने आणि पणजीच्या सभोवताली असणाऱ्या अलिशान उत्तम सेवा देणाऱ्या जहाजांवर आहेत. विशेष म्हणजे आता तुम्ही गोवा सोडून सिक्कीम, दमण आणि दीव या केंद्रशासित प्रदेशातही बिनदिक्कत कसिनो खेळू शकता.

सध्या गोव्याच्या महसुलात मोठा भाग हा कसिनो सारख्या खेळातूनच येतो. पर्यटनपेक्षा जास्त पैसे गोव्याला या खेळातून मिळतात. काही लोकांनी भारत सरकारचे नियम शब्दश: घेतल्याने आजही कोट्यावधी रुपयांची उलाढाल एखाद्या सध्या जहाजावर होते. मात्र, ही रंजक माहिती फ़क़्त वाचायची असते. कसिनो खेळायला जाऊन पैसे गमावण्याची अवदसा अजिबात मनात येऊन देऊ नका. कारण, तिथे पैसे मिळतात ते कसिनो मालकाला. खेळणाऱ्यांना मिळतीलच याची काहीच खात्री नाही.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here