वाचा लाडक्या छत्रपतींच्या बुद्धीशौर्याच्या गोष्टी; पहा शिवरायांनी नेमके काय केले होते ते

छत्रपती शिवाजी महाराजांच्या अवतीभवती अनके भूषणे लावली जातात. मात्र छत्रपती हे बिरूद महाराजांच्या नावाशी प्रचंड घट्ट चिकटलेलं आहे. महाराजांकडे अनेक अंगभूत कौशल्ये होती. महाराजांनी लावलेला वाघनख्यांचा शोध असेल किंवा मग गनिमी कावा असेल. अनेक लोकांना आजही शाहिस्तेखानाची बोटे तोडली किंवा अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला इतकीच काय ती महाराजांची ओळख आहे. आज यापलीकडे जाऊन महाराजांचे पॉलीटीक्स समजून घेऊ. तसेच महाराज किती जबरदस्त अभियंता, भूगर्भशास्त्रज्ञ होते हेही समजून घेऊ.   

शिवाजी महाराजांना काळी विद्या प्राप्त आहे, असा समज ब्रिटिशांमध्ये होता. त्याचे अनुभवही त्यांनी वेळोवेळी घेतले होते. दरवेळी महाराज आपल्या कुशाग्र बुद्धीने आणि गनिमी काव्याने सगळ्यांना चकवा देत. तो चकवा इतका बेमालूम असायचा की लोकांमध्ये शिवाजी महाराजांना काळी विद्या प्राप्त असल्याचा समज आपोआप निर्माण झाला. आपल्याला कुटुंब एकत्र ठेवता-ठेवता दमछाक होते. विचार करा… त्याकाळी एक राजा त्याच्यामागे स्वराज्य, अंतर्गत फुट, समोर उभा ठाकलेल्या लाखोंच्या फौजा त्याही मोठ्या लवाजम्यासह… असे कित्येक व्याप असतानाही इतका बारीक विचार कुणी कसा करू शकतो, हा प्रश्न पडतो. मात्र, शिवाजी महाराज बुद्धीने एवढे अफाट होते की त्यांचा नादच कुणी करू शकत नव्हतं. गनिमी कावा हे शिवरायांचे सर्वात मोठे अस्र होते. गनिमी काव्याचा वापर करून शिवरायांनी नेहमीच शत्रूला त्यांच्या नकळत पराभूत केले होते.

असाच एक किस्सा आहे ब्रिटीश जहाजांचा. विजयदुर्गवर चाल कुणीच करू शकत नाही, असा समज सर्वदूर पसरला होता. जवळ येताच जहाजे मोडतात, तुटतात असाही समज होता. त्यातच महाराजांना काळी विद्या येते, हे ब्रिटीशांना ठावूक होते. त्यामुळे घाबरतच विजयदुर्ग किल्ल्यावर ब्रिटीशांची ३ जहाजे चाल करून आली होती. जसजसा विजयदुर्ग जवळ येऊ लागला. तसतसे ब्रिटीश खुश होऊ लागले. तरीही मनात थोडीशी भीती होतीच. कारण त्यांच्या मनात हे ठाम झाले होते की, शिवरायांना काळी विद्या प्राप्त आहे. मात्र, आता किल्ला टप्प्यात आला होता. ती चाल करण्याकरता जो ब्रिटीशांचा लीडर होता, तो थोडासा खुश दिसत होता. मात्र, अचानकपणे कडाडडकड असा मोठा आवाज झाला. नंतर जहाजाचा वेग मंद व्हायच्या आतच इतर दोन्ही जहाजांची तीच अवस्था झाली. काही कळायच्या आतच तिन्ही जहाजे बुडाली. त्यानंतर कित्येक वर्ष ब्रिटीशांच्या मनात काळी विद्या असल्याचा समज कायम राहिला. ही जहाजे बुडण्यामागचे प्रमुख कारण होते ती विजयदुर्गाच्या सभोवताली असणारी पण पाण्यात असल्यामुळे न दिसणारी जाडजूड भिंत.

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की त्या भिंतीमुळे जहाजे मोडू शकतात तर मग किल्ल्यावर जायचे कसे? स्वराज्याच्या आरमाराची जहाजं गलबतं-मचवे वगैरे हे सर्व सैन्य अगदी आरामात या भिंतीवरून प्रवास करायचे कारण त्यांचे तळ, उथळ आणि सपाट होते. सर्वसाधरणपणे चाल करून येताना मोठी जहाजे वापरली जात जेणेकरून जास्त सैन्य आणि दारुगोळा वापरता येईल. मोठ्या जहाजांचे तळ निमुळते आणि खोल असायचे परिणामी जेव्हा जेव्हा ब्रिटीश जहाजं गडाकडे आगेकूच करायची आणि जवळ यायची तेव्हा या भिंतीला धडकून पाण्यात बुडून जायची. यावरून छत्रपती शिवाजी महाराजांचा अभियांत्रिकी विषयाचा किती दांडगा अभ्यास होता. समुद्राच्या तळाशी बांधलेल्या या भक्कम भिंतीमुळं आणि महाराजांच्या अभियांत्रिकी कौशल्यामुळे विजयदुर्ग अभेद्य राहीला.

महाराज भूगर्भशास्त्रज्ञही होते. वयाच्या विशीत त्यांनी अशा पद्धतीने भूगर्भात काम केले आहे की त्याला तोड नाही. आजकालची परिस्थिती अशी आहे की कित्येक ठिकाणी शेकडो फुट बोअर मारूनही पाणी लागत नाही. मात्र, महाराजांच्या प्रत्येक गडावर असणाऱ्या हौदात पाणी असतेच. महाराजांच्या बहुतांश गडावर गेल्यास एका गोष्टीमध्ये समानता आढळेल. ती म्हणजे त्या किल्ल्यांवर असणारे हौद आणि त्यांचे आकार. महाराजांनी प्रत्येक किल्ल्यावर २ प्रकारचे हौद बांधलेले आहेत. पैकी एक जे आपल्याला सहजासहजी नजरेत येतात आणि दुसरे म्हणजे जे दिसून येत नाहीत ते भूगर्भात आहेत. पाण्याचे टाके खडकाच्या कपारीला ५० ते १५० फुट पर्यंत खोल कोरलेले आहेत परिणामी हजारो फुट उंचीवर असणाऱ्या त्या आयताकृती हौदांमध्ये आपल्याला पाणी दिसून येते. असे म्हटले जाते की, महाराजांनी राजगडचे डिझाइन स्वतः बनवले आणि वयाच्या १७ व्या वर्षी राजगड बांधला.  

अशा अनेक कथा आणि दंतकथा छत्रपती शिवरायांच्या नावाने आहेत. त्यांच्या अफाट कार्यामुळे अशा पद्धतीने त्या असणेही साहजिकच आहे. असा हा द्रष्टा आणि गोर-गरीबांचा राजा आपल्या महाराष्ट्राला लाभला होता हेच आपले भाग्य आहे की..

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here