‘त्या’ महिन्यानंतर राज्यात भाजपचेच सरकार; ‘या’ माजी मंत्र्याच्या दावा

अहमदनगर :

महाविकास आघाडी सरकार ३ महिनेही टिकणार नाही, असे म्हटले जात असताना महाविकास आघाडी सरकारला १ वर्ष पूर्ण होत आहे. अशातच एका माजी मंत्र्याने एक मोठा दावा केला आहे. हा दावा कशाच्या आधारे केला हा मोठा प्रश्न आहे. माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी ‘राज्यात पुढची पाच वर्षे सोडूनच द्या, पण आताचीच पाच वर्षेसुद्धा महाविकास आघाडी सरकार टिकणार नाही, हे महाराष्ट्रातील जनता सुद्धा सांगेल. त्यासाठी कोणत्याही भविष्यकाराची आवश्यकता नाही. डिसेंबरनंतर राज्यात भाजपचेच सरकार येईल,’ असा दावा केला आहे.

पुढे बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, ‘नगर जिल्ह्यातून भाजपमधून राष्ट्रवादीत कोणीही जाणार नाही,’ असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी ते नगरमध्ये बोलत होते. राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी ‘राज्यामध्ये महाविकास आघाडी सरकार पाच वर्ष पूर्ण करेल, यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही. उलट आमची पाच वर्षे व्यवस्थित व अशा पद्धतीने पूर्ण होणार आहेत की, पुढची पाच वर्ष आम्ही तिथे असणार आहोत,’असे विधान केले होते. मात्र या विधानाची कर्डिले यांनी खिल्ली उडवत ‘डिसेंबरनंतर राज्यात भाजपचेच सरकार’ येणार असल्याचा दावा केला आहे.

खडसेनंतर कर्डिलेही राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना कर्डिले यांनी पूर्णविराम दिला. कर्डिले म्हणाले की, खडसे हे जेव्हा भाजपमध्ये होते व ते विरोधी पक्षनेते होते, त्यावेळी माझ्यावर एक संकट आले होते. त्यावेळी मला खोट्या गुन्ह्यात गुंतवण्यात आले होते. तेव्हा अन्यायाच्या विरोधात न्याय देण्याची भूमिका बजावण्यासाठी एकनाथ खडसे नगरमध्ये आले होते. त्यांचे व माझे जवळचे संबंध असल्यामुळे लोक तशी चर्चा करीत असावेत. परंतु ज्या दिवशी खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला, त्याच दिवशी हा सगळा विषय संपला आहे. मला भाजप सोडून कुठल्याही पक्षात जायचे नाही. तसेच मला कोणी संपर्कही केला नाही, व मला त्याची आवश्यकताही नाही.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here