बोगस कांदा बियाणाचे धागेदोरे सापडेनात; कोट्यावधींची झाली फसवणूक

अहमदनगर :

यंदा कृषी विभागाच्या कृपेने रासायनिक खतांसह बियाण्यांचा तुटवडा आणि फसवणूक जोरात सुरू आहे. आता रब्बी हंगामाच्या तोंडावर याला आणखी उत येण्याची शक्यता आहे. त्यातच बोगस कांदा बियाण्याचे ठोस धागेदोरे काही कृषी विभागाला सापडलेले नाहीत. यात नेमके काय अर्थपूर्ण गौडबंगाल आहे हेच शेतकऱ्यांना समजेनासे झालेले आहे.

कांद्याचे भाव वाढत असतानाच बियाणे पुरवठा बाधित झाल्याने यंदा शेतकऱ्यांचे खूप हाल झाले. पावसाने उभी पिके मातीमोल झाल्यावर कांदा बियाण्यात फसवणुकीचे सत्र सुरू झाल्याने राज्यातील लाखो शेतकऱ्यांची कोट्यावधींची फसवणूक झालेली आहे. अनेक ठिकाणी कृषी विभागाच्या कृपेनेच हा फसवणुकीचा बाजार तेजीत असल्याची चर्चा आहे.

अशातच एक नमुना म्हणून श्रीगोंदा तालुक्यातील मांडवगण येथील एकाला पोलिसांनी बनावट कांदा बियाणे कंपन्यांच्या नावाने विकत असल्याच्या प्रकरणी पकडले आहे. यवतमाळ येथील अमोल धबागडे हा या बनावट बियाणे विक्रीच्या टोळीचा म्होरक्या आहे. मात्र, आपला जिल्हा सोडून नगर जिल्ह्यात हा आरोपी नेमका कोणाच्या छत्रछायेखाली काळे धंदे करीत होता यावर अजूनही प्रकाशझोत पडलेला नाही.

एकूणच याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस तपास करीत आहेत. त्याचवेळी कृषी विभागाने मात्र यावर अजूनही आपली ठोस अशी भूमिका जाहीर केलेली नाही. कृषी विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर खर्या अर्थाने हे तपासण्याचे आणि अशा पद्धतीने बोगस बियाणे विक्री होऊ न देण्याची जबाबदारी होती. अशा पद्धतीने हजारो शेतकऱ्यांना फसवणुकीचे रॅकेट उघडकीस आल्यावरही कृषिमंत्री दादा भुसे यांच्या कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी आपली कार्यवाहीची दिशा जाहीर न करणे शेतकऱ्यांना कोड्यात टाकणारे आहे.

संपादन : सचिन मोहन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here