भाजपकडून बंगालमध्ये मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार होणार का?; सौरव दादा म्हणाला…

कोलकाता :

पुढच्या वर्षी होणाऱ्या पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने तयारी सुरु केली आहे. नेमका कोणता मासा कोणत्या गळाला लागणार, याचा अंदाज घ्यायला भाजपसारखा पक्ष आधीच तयारी करतो आहे. दरम्यान सध्या बिहार निवडणुकीतही भाजपने आपली पूर्ण ताकद पणाला लावली आहे. असे असले तरीही तेजस्वी यादव हे वरचढ ठरतील, असे एकूण चित्र आहे. अशातच पश्चिम बंगा मध्ये सत्ताधारी तृणमूल काँग्रेसला टक्कर देण्यासाठी भाजपनं गेल्या काही महिन्यांपासूनच तयारी सुरु केली आहे.

भाजपकडून या निवडणूकीसाठी बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली हे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार असू शकतात, अशी चर्चा आहे. मात्र याविषयी सौरव गांगुली मात्र अजिबातच उत्सुक नसल्याचे समजत आहे. ‘द टेलिग्राफ’ने दिलेल्या वृत्तानुसार मी राजकारणात उतरणार नाही आणि विधानसभा निवडणुकीत भाजपसाठी प्रचारदेखील करणार नाही, असं गांगुली यांनी भाजपच्या नेतृत्त्वाला कळवलं आहे.

मी सध्या बीसीसीआयचा अध्यक्ष म्हणून काम करत आहे. मी माझ्या कामाबद्दल समाधानी आहे. त्यात मी खूष आहे, असा निरोप दिल्यावर भाजपनं त्यांच्यावर उमेदवारी किंवा प्रचार करावा म्हणून कुठलाही दबाव आणलेला नाही, असेही ‘द टेलिग्राफ’ने दिलेल्या वृत्तात सांगितले आहे.

दरम्यान सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात सौरव गांगुली यांनी भाजपसाठी महत्त्वाची भूमिका बजवावी, यासाठी पक्षाकडून बरेच प्रयत्न सुरू होते. सौरव गांगुली यांनी पक्षासाठी काम करावं यासाठी प्रयत्न केले गेले. मात्र सध्या ते दुसऱ्या कामात व्यस्त आहेत.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here