मोदी सरकारने दिले ‘ते’ काम थांबवण्याचे आदेश; ‘त्यावरून’ पुन्हा एकदा केंद्र विरुद्ध राज्य सामना

मुंबई :

मेट्रो कारशेडवरून आजी आणि माजी मुख्यमंत्री एकमेकांना भिडले होते. आता पुन्हा एकदा त्याच मुद्द्यावरून पुन्हा एकदा केंद्र विरुद्ध राज्य सामना बघायला मिळू शकतो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या निर्णयानुसार आरेमधील मेट्रो कारशेड कांजूरमार्गमध्ये स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला. या कामाला आता एमएमआरडीएनं कांजूरमार्गमध्ये कामाला सुरुवात केली आहे. मात्र आता केंद्राने हे काम थांबवण्यास सांगितले असून ज्या जागेवर हे काम चालू आहे त्या कांजूरमार्गमधील जागेवर केंद्राने दावा सांगितला आहे.

केंद्र सरकारच्या उद्योग आणि व्यापार संवर्धन विभागानं राज्य सरकारला पत्र लिहित या जागेविषयी माहिती देत काम थांबविण्यास सांगितले आहे. गुरुप्रसाद मोहापात्रा यांनी राज्य सरकारला पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, जिल्हाधिकारी, एमएसडी आणि एमएमआरडीए यांनी केलेल्या कार्यवाहीमुळे डीपीआयआयटीचं मोठं नुकसान झालं आहे. भारत सरकारच्या हितांचं संरक्षण करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी यासंदर्भात दिलेले आदेश रद्द करावेत, अशी मी विनंती करतो. गुजरात केडरचे अधिकारी असलेले गुरुप्रसाद मोहापात्रा डीपीआयआयटी विभागाचे प्रमुख आहेत.

दरम्यान आदित्य ठाकरेंनीसुद्धा आक्रमक भूमिका घेत म्हटले की, कांजूरमार्गमध्ये सुरू असलेलं काम थांबणार नाही. केंद्राकडून राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार यांना पाठवण्यात आलेल्या पत्राची मला कल्पना आहे. पण ती जागा केंद्राच्या मालकीची नाही, तर राज्य सरकारच्या मालकीची आहे.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here