अर्थव्यवस्था पूर्वपदावर येत असताना राजीव बजाज यांनी केले महत्वाचे भाष्य; वाचा, काय म्हटले त्यांनी

मुंबई :

बाजारात होत असलेली उलाढाल, मोबाईल आणि वाहन क्षेत्रात मोठ्या प्रमाणात झालेली विक्री, सण-वाराच्या पार्श्वभूमीवर चालू असलेली सामान्य जनतेची खरेदी ही सर्व अर्थव्यवस्था पूर्वपदावर येत असल्याची चिन्हे आहेत. दरम्यान याच विषयावर बजाज ऑटोचे व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज यांनी आपलं मत मांडत महत्वाच्या मुद्द्यावर नेमकं भाष्य केलं आहे.  इंडिया टुडेला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी म्हटलं आहे की, वाहन क्षेत्रातील विक्री पुन्हा पूर्वपदावर आल्याचं म्हटलं जात आहे. परंतु यासाठी अजूनही वाट पाहावी लागेल.

पुढे बोलताना ते म्हणाले की, एप्रिल ते जून या कालावधीत थोड्याप्रमाणात वाहनांची विक्री झाली. विशेष करून दुचाकींची विक्री झाली नाही. आता हळूहळू दुचाकीची विक्री वाढतच आहे. परंतु आताच या परिस्थितीची तुलना गेल्या वर्षातील विक्रीशी करता येणार आहे. जुलै महिन्यापासून पुढील वर्षाच्या मार्च महिन्यापर्यंतच्या विक्रीची आकडेवारी पाहावी लागेल. त्यानंतरच चित्र स्पष्ट होईल.

सध्या सणासुदीचा कालावधी आहे. काही ग्राहक दुचाकी खरेदी करतही आहेत. काही लोक असेही असतात जे सणासुदीच्या कालावधीत वाहन खरेदी करण्याची वाट पाहत असतात. अशातच सणासुदीच्या कालावधीत झालेल्या विक्रीची संपूर्ण महिन्याशी तुलना करणं अयोग्य ठरेल. त्यासाठी आपल्याला थोडी वाट पाहावी लागेल, असे त्यांनी म्हटले आहे.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here