शिवसेनेचाही जाहीर पाठींबा; राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्या पाठीशी उभं राहणं गरजेचं

मुंबई :

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून आज शिवसेनेनं ‘मोहम्मद पैगंबर यांचे कोणतेही चित्र अस्तित्वात नाही. ही श्रद्धा आहे. त्यामुळे असे चित्र काढणे हा मुसलमानांनी गुन्हा ठरवला, पण त्या गुन्ह्यासाठी ‘अल्ला हो अकबर’चे नारे देत लोकांना गळे चिरून मारा, असेही पवित्र कुराणात लिहिलेले नाही किंवा पैगंबर साहेबांनी सांगितलेले नाही. त्यामुळेच फ्रान्समध्ये ज्यांनी धर्माच्या नावावर गळे चिरण्याचा अमानुष, अघोरी प्रकार केला ते मानवतेचे, जगाचेच शत्रू आहेत. मॅक्रॉन यांच्या पाठीशी त्यासाठीच उभे राहणे गरजेचे आहे. हिंदुस्थानातील राजकीय पक्षांनी व मुस्लिम समुदायाने फ्रान्सच्या अंतर्गत भानगडीत पडण्याचे कारण नाही!’, असे म्हणत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

नेमकं काय म्हटलं आहे सामनात :-

फ्रान्समध्ये एक ठिणगी पडली आहे व त्याचा वणवा जगभरात पसरताना दिसत आहे. फ्रान्समध्ये जे घडले त्याचा संबंध पुन्हा एकदा पैगंबर मोहम्मदांच्या व्यंगचित्राशी आहे. प्रेषित मोहम्मदांचे व्यंगचित्र काढल्यामुळे मुस्लिमांच्या भावना भडकल्या. त्या इतक्या की, धर्मांध मुसलमानांनी लोकांचे गळे चिरून हत्या केल्या आहेत व कॅनडापासून फ्रान्सपर्यंत निरपराध लोकांवर चाकूहल्ले सुरू झाले आहेत. मुंबई-ठाण्यातील मुस्लिमांनीही फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन यांच्या विरोधात निदर्शने केली. भाजपचे राज्य असलेल्या भोपाळमध्ये मॅक्रॉनविरोधात हजारो मुसलमान जमले व त्यांनी घोषणाबाजी केली. राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्या विरोधात जगभरातील मुस्लिम समुदाय छाती बडवत आहे. मॅक्रॉन यांनी इस्लाम आणि दहशतवादाचा संबंध जोडला व फ्रान्समधील इस्लामी दहशतवाद मुळापासून उखडून काढण्याचा निश्चय त्यांनी केला. मॅक्रॉन यांची भूमिका वादग्रस्त ठरवली जात आहे. फ्रान्स हा सर्वच प्रकारचे स्वातंत्र्य मानणारा देश आहे.

हिंदुस्थानच्या संकटकाळी फ्रान्स नेहमीच आपल्या पाठीशी उभा राहिला आहे. 1998 साली पोखरण अणुचाचणीनंतर हिंदुस्थानवर अमेरिकेसह अनेक राष्ट्रांनी निर्बंध लादले असताना फ्रान्स हिंदुस्थानचा मित्र म्हणूनच वागला. ‘युनो’मध्ये जेव्हा जेव्हा गरज पडली तेव्हा फ्रान्सने हिंदुस्थानचे समर्थन केले. पाकिस्तान, चीनसारख्या दुश्मनांशी मुकाबला करण्यासाठी फ्रान्सने हिंदुस्थानला संरक्षणसामग्रीही पुरवली. मिराज, राफेलसारखी लढाऊ विमाने फ्रान्सकडून हिंदुस्थानला मिळाली आहेत. अशा फ्रान्समध्ये धर्मांधतेचा उद्रेक घडवून दहशतवाद निर्माण होणे व त्यातून हिंसाचाराचा भडका उडणे हिंदुस्थानलाही परवडण्यासारखे नाही. फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन यांनी दहशतवादाविरुद्ध युद्ध पुकारले आहे व पंतप्रधान मोदी यांनी युद्धात प्रे. मॅक्रॉन यांना पाठिंबा जाहीर केला आहे हे योग्यच झाले. 

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here