अशी बनवा चवदार भन्नाट मासवडी; वाचा आणि शिका रेसिपी, अन ट्रायही करा की

अहमदनगरमधील पारनेर तालुक्यातील कोणत्याही भागात गावात आपण गेला तर आपल्या मेजवानीसाठी ‘मासवडी’ हा अत्यंत रुचकर खाद्यपदार्थ आपल्या पुढ्यात आल्याशिवाय राहणार नाही. अनेक नॉन-व्हेज खवय्येही या शुध्द शाकाहारी ‘मासवडी’चे फॅनच होणार. नेमका काय प्रकार आहे हा ? आपल्या खाण्यात आला आहे काय? नाही, चला तर तुम्हाला मासवडीबाबत अधिक माहिती घेऊयात. 

सारण तयार करण्यासाठी लागणारे साहित्य :

         १ वाटी हावरी (गावरान तीळ)

         १ वाटी खोबरे

         लसूण चवीप्रमाणे  

         २-३ मध्यम आकाराचे कांदे

         १/२ चमचा  गरम मसाला

          हळद प्रमाणानुसार

         हिंग पावडर (आवडीनुसार)

         कोथींबीर एक जुडी

         मीठ चवीनुसार


आवरणासाठी लागणारे साहित्य  :

         बेसन २ वाटी

         लाल तिखट १ चमचा

         हळद १/४ चमचा

         चवीप्रमाणे मीठ


आमटी (रस्सा) बनविण्यासाठी लागणारे साहित्य :

         खोबरे १ वाटी

         कांदे २ (मध्यम आकाराचे )

         लसून साधारणपणे १० ते १५ पाकळ्या

         आले – एक छोटा तुकडा

         कोथींबीर

         २ चमचे गरम मसाला

         लाल तिखट १/२ चमचा

         हळद

         १/४ चमचा मीठ चवीनुसार

मासवाडी तयार करण्याची कृती :

सर्वप्रथम सारण तयार करणे आवश्यक आहे, ते बनविण्यासाठी तीळ ,खोबरं कोरडीच, वेगवेगळी भाजून घ्यावे. ते गार झाल्यावर मिक्सरमध्ये जाडसर राहतील अशा पद्धतीने दळून घ्यावे. कढईमध्ये तेल गरम करावे. कांदा बारीक चिरून घ्यावा. बारीक चिरलेला कांदा व लसूण लालसर परतवून घ्यावे. कांदा व लसूण गार झाल्यावर मिक्सरमध्ये वाटावा. तीळ खोबरं आणि वाटलेले कांदा लसूण एकत्र करावे. त्यात चवीनुसार मीठ घालावे. अशा पद्धतीने सारण तयार झाले.

त्यानंतर आवरण बनवायला घ्यावे. कढईमध्ये गरम तेलात लाल तिखट, हळद, मीठ टाकावे. त्यात एक ग्लासभर पाणी ओतावे. पाण्याला उकळी आल्यावर बेसन पीठ घालून घोटून घ्यावं. गुठळ्या होणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. मध्यम आचेवर ठेवून २-३ वाफा घ्याव्यात. बेसन चांगले शिजवून घ्यावे. शिजल्यावर गरम आहे तेच, वड्या बनवायला घ्याव्या. एका पोळपाट घ्या, त्यावर रुमाल पसरवा. रुमालावर पाण्याचा हात फिरवावा. शिजवलेलं गरमगरम बेसन रुमालावर गोल आकारात पसरावे. त्यावर सारणाचा पातळ थर द्यावा. रुमालाचे एक बाजूने टोक पकडून गोलाकार फिरवत नेऊन गोल वडी तयार करावी. वडीला दोनही बाजूंनी दाब देऊन थोडासा त्रिकोणी आकार द्यावा. काहीशी त्रिकोणी आकाराची तयार झालेली वडी एका ताटात काढून घ्यावी. सर्व वड्या तयार झाल्या की मग, वरून खोबर्याचा कीस आणि बारीक चिरलेली कोथींबीरने सजवावे.

आपल्याला मासवडीतील शेवटचा आणि महत्वाचा घटक असणारा ‘रस्सा’ अर्थात आमटी कशी बनवितात, हे पाहायचे आहे. आमटी बनविण्यासाठी खोबरे, कांदा, लसूण पाकळ्या तव्यावर गरम तेलात परतून घ्यावे. परतल्यावर थोडं गार होऊ द्या. आले, कोथींबीरसह  सगळं मिक्सरवर बारीक वाटून घ्यावं. कढईमधे तेल गरम करून घ्यावे. त्यात गरम मसाला, लाल तिखट, हळद घालावं बारीक केलेला मसाला घालावा. त्याला तेल सुटे पर्यंत गरम करून घ्यावं. मसाल्याला तेल सुटायला लागल्यावर त्यात गरम पाणी घालून हवा तेवढा रस्सा बनवावा. चवीनुसार मीठ वापरावे. १५-२० मिनिटे रस्याला उकळी येऊ द्यावी, अशा पद्धतीने चांगली तर्रीबाज आमटी तयार झाली.

 जेवताना मासवडी, रस्स्यासोबत वाढावी. त्यात चवीप्रमाणे लिंबू पिळून बाजरी किंवा ज्वारीच्या भाकरी सोबत खायला खूप छान वाटते. भाकरी नसेल तर तुम्ही चपाती सोबतही खाऊ शकता. सोबत कांदा, टोमॅटो, शक्य असेल तर काकडी घ्यायला विसरू नका.

हा असला भन्नाट बेत एकदा करून पहा, आणि आम्हालाही कळवा, तुमचा बेत…

संपादन : महादेव पांडुरंग गवळी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here