अशी बनवा शेहरजादे इराणी फिश बिर्याणी; रेसिपी वाचा आणि नक्कीच ट्राय करा

बिर्याणीचे मूळ पर्शियन आहे असे म्हणतात. आता त्यात किती तथ्य आहे हे माहिती नसलं तरी बिर्याणी नावाचा खाद्यपदार्थ अख्या जगाला वेड लावतो हे मात्र निश्चितच. बिर्याणीचे मूळ पर्शियन म्हणजे आताचे इराण. बिर्याणी पुढे मोघल शाही भटारखान्यात अजून रंजक बनविण्यात आली व तीला भारतातही आणली मोघलांनीच. आज बनवलेल्या बिर्याणीचे नाव एका पर्शियन राणीच्या नावा नंतर ठेवण्यात आले आहे… शेहरजादे….ही राणी म्हणतात खूप छान अरबी कथा सांगायची. इराण मधे शाहीजीरे, केशर, किसमिस हे प्रामुख्याने वापरले जाणारे घटक आहेत. त्याचाच वापरही ही बिर्याणी बनवण्यसाठी करण्यात आला.

साहित्य घ्या मंडळीहो….

फिश मॅरीनेड साठी :-

 1. 400 ग्रॅम बोनलेस सुरमई चे 2 इंचाचे तुकडे
 2. 1 नग अंड
 3. 1/4 टीस्पून काळीमीरी पूड
 4. 1 टीस्पून हळद
 5. 1 टेबलस्पून गरम मसाला
 6. 1 टीस्पून लाल तिखट
 7. 1 टीस्पून मीठ
 8. 1 टेबलस्पून लसूण पेस्ट
 9. 1 टीस्पून आले पेस्ट
 10. 1 टेबलस्पून बारीक चिरलेला पुदिना
 11. 1 टेबलस्पून कॉर्नफ्लोर
 12. 2 टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर
 13. तळण्यासाठी तेल
 14. भाताच्या पाणी (फिश स्टॉक) साठी :
 15. 4 कप फिश स्टॉक
 16. 3 लवंग
 17. 1 बडी वेलची
 18. 2 हिरवी वेलची
 19. 2 इंच दालचिनी तुकडा
 20. 5 अख्खी काळीमीरी
 21. 1 जायपत्री
 22. 1/2 टीस्पून शाह जीरे
 23. 1/4 टीस्पून बडीशेप
 24. 1 टीस्पून अख्खे धणे
 25. बिर्याणी भाता साठी :
 26. 400 ग्रॅम बासमती तांदूळ
 27. 1/4 कप तूप
 28. 1 टीस्पून लिंबू रस
 29. 2 सुक्या लाल मिरच्या
 30. 2 तमालपत्र
 31. 1 मोठा कांदा
 32. 1 मोठा टोमॅॅटो
 33. 1 टीस्पून लसूण पेस्ट
 34. 1 टीस्पून बारीक लांब आल्याचे काप
 35. 1 टीस्पून मीठ

फिश ग्रेव्ही साठी :-

 • 1/4 कप तेल
 • 2 मोठे कांदे
 • 1 मोठा टोमॅटो
 • 1/2 कप दही
 • 1 टेबलस्पून लसूण पेस्ट
 • 1 टीस्पून आले पेस्ट
 • 1 हिरवी भोपळी मिरची
 • 1 टेबलस्पून लाल तिखट
 • 1/2 टीस्पून हळद
 • 1 टीस्पून गरम मसाला
 • चवीनुसार मीठ
 • 1 टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर
 • 1/2 कप पाणी

लेयरींग साठी :-

 • 1/2 कप तळलेला कांदा
 • 2 टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर
 • 2 टेबलस्पून बारीक चिरलेला पुदिना
 • 2 टेबलस्पून केशर घातलेलं पाणी
 • 1 थेंब केवरा इसेंस

साहित्य घेतले का… आता मग लागा बनवायला…

 1. तांदूळ स्वच्छ धुवून 40 मिनिटे पाण्यात भिजवून ठेवावे. एकीकडे 2 कांदे बारीक लांब कापून तेलात खरपूस गुलाबी होईपर्यंत तळून घ्यावे
 2. फिश मधले 2 तुकडे बाजूला ठेवून उर्वरित फिशला मॅरीनेड साठी कॉर्नफ्लोर व तळण्यासाठी तेल सोडून दिलेले सर्व साहित्य लावून 30 मिनिटे मॅरीनेड करण्यासाठी ठेवावे.
 3. एक पातेल्यात 4 कप पाणी घेऊन त्यात बाजूला ठेवलेले फिशचे तुकडे घालून 25 मिनिटे छान उकळावे, पाणी 3 कप झाले पाहिजे. नंतर भाताच्या पाण्यासाठी मधे दिलेले सर्व खडे मसाले एका स्वच्छ कपड्याच्या पोटलीत बांधून ह्या पाण्यात सोडून 10 मिनिटे आणखी उकळावे व नंतर पोटली काढून घ्यावी. एकीकडे दुसर्‍या पातेल्यात पाणी ठेवून उकळी आल्यावर त्यात 4 टोमॅटो सोडावे व 3 मिनिटांनी गॅस बंद करावा. ठंड झाल्यावर हे टोमॅटो सोलून घ्यावे व त्याची बारीक प्युरी करावी.
 4. आता बिर्याणी भात बनविण्यास घ्यावे. एका पातेल्यात तूप घालून त्यात लाल मिरची व तमालपत्र घालावे. नंतर बारीक चिरलेला कांदा, आले लसुण पेस्ट घालून अगदी नरम होईपर्यंत परतावे. मग 1/2 कप टोमॅटो प्युरी घालून छान एकजीव करून परतावे
 5. आता त्यात तयार फिश स्टॉक(1/2 कप फिश स्टॉक ग्रेव्ही साठी काढून घ्यावा), लिंबू रस व मीठ घालून एक मस्त उकळी येऊ द्यावी व नंतर त्यात निथळलेले तांदूळ घालून मोठ्या आचेवर 90% भात शिजवून घ्यावा. शिजलेला भात परातीत काढून पूर्ण ठंड होण्यास पंख्याखाली ठेवावा. असे केल्याने एकएक कण छान मोकळा होतो व भात जास्त निंबरून चिकट होत नाही.
 6. मॅरीनेटेड फिश ला 1 टेबलस्पून कॉर्नफ्लोर लावून घ्यावे व कढीईत तेल चांगले तापवून त्यात मध्यम आचेवर तांबूस गुलाबी होईपर्यंत तळून घ्यावे.
 7. आता फिश ग्रेव्ही बनवावी. त्यासाठी कढीईत तेल तापल्यावर त्यात कांद्याची पेस्ट व आले लसुण पेस्ट घालून तेल सुटे पर्यंत परतावे व नंतर उरलेली सर्व टोमॅटो प्युरी व दही घालून छान एकजीव करून घ्यावे. आता लांबट चिरून हिरवी भोपळी मिरची घालावी
 8. आता उरलेला फिश स्टॉक, हळद, लाल तिखट, गरम मसाला पावडर, मीठ घालून एक मस्त उकळी येऊ द्यावी व नंतर त्यात तळलेली फीश घालून गॅस बंद करावा.
 9. लेयर साठी प्रथम पातेल्यात तूप लावून घ्यावे व त्यावर ठंड भाताची लेयर. केशर च्या पाण्यात 1 थेंब केवरा इसेंस घालून ढवळावे. त्यातले थोडे पाणी भाताच्या लेयर वर शिंपडावे, मग तळलेला कांदा, कोथिंबीर व पुदिना पसरून दाबावे. त्यावर तयार सर्व फिश ग्रेव्हीची लेयर लावावी. पुन्हा भाताची लेयर लावावी.
 10. आता सगळे केशर पाणी, तळलेला कांदा, कोथिंबीर व पुदिना घालून पुन्हा छान दाबावे.
 11. घट्ट झाकण ठेवून/लावून मंद आचेवर पातेल्या खाली तवा ठेवून 15 मिनिटे वाफेवर शिजन्यास ठेवावे. बिर्याणी अगदी गरम सर्व्ह करु नये… 10 मिनिटे वाफ मोकळी होऊ द्यावी व मग सर्व्ह करावे.

संपादन : संचिता कदम 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here