एसटी पाजणार ग्राहकांना शुद्ध पाणी; ‘नाथजल’ शुद्धपेयजल योजनेला झाली सुरुवात

मुंबई :

एसटी बसस्थानकावर मिळणारे निकृष्ट अन्नपदार्थ, तेथील स्वच्छता आणि शुद्ध पिण्याच्या पाण्याची बोंबाबोंब वर्षानुवर्षे कायम आहे. अगदी करोना नावाचा भयानक विषाणू येऊनही त्यात काहीच बदल झालेला नसताना प्रवाशांना एक सुखद झटका महामंडळाने दिला आहे.

त्यासाठी महामंडळाने ‘नाथजल’  शुद्ध पेयजल योजनेची मुहूर्तमेढ रोवली आहे. त्यातून यापुढे एसटीच्या लाखो प्रवाशांना स्वस्त दरात दर्जेदार बाटलीतून शुद्ध पाणी पिण्याला मिळणार आहे. या महत्त्वाकांक्षी योजनेचे उद्घाटन परिवहन मंत्री व महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमात परब म्हणाले की, या  योजनेअंतर्गत महामंडळाच्या प्रत्येक बस स्थानकावर महामंडळाचे अधिकृत बाटली बंद पेयजल उपलब्ध करून देण्यात येणार आहे. वारकरी संप्रदायामध्ये आपल्या गुरूला ‘नाथ’ या नावाने संबोधले जाते. त्यामुळे या बाटलीबंद पेयजलास ‘नाथजल’ हे नाव देण्यात आले आहे. प्रवाशांना किफायतशीर दरामध्ये दर्जेदार शुद्ध पेयजल एसटी महामंडळाकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

संपूर्ण राज्यात बाटलीबंद पाणी पुरविण्यासाठी Oxycool कंपनीला अर्थात मे. शेळके बेव्हरेजेस प्रा. लि. (पुणे) यांना अशी बाटली बनवण्याचे आणि वितरणाचे काम देण्यात आलेले आहे.  सर्व बस स्थानकावर 650 मिलीमीटर व 1 लिटर बाटलीबंद स्वरूपामध्ये हे पाणी विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. यांचा दर अनुक्रमे 10 रुपये व 15 रुपये इतका असेल.

संपादन : सचिन पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here