खडसेंची गर्जना; मी भाजपला ताकद दाखवून देतो. उत्तर महाराष्ट्रात आता फक्त…

जळगाव :

संपूर्ण कारकीर्द भाजपमध्ये काढणाऱ्या एकनाथ खडसेंनी मावळतीच्या वेळी पक्ष बदलत भाजपला झटका दिला आणि हाती घड्याळ बांधले. खडसेंच्या राष्ट्रवादीकॉंग्रेसमध्ये झालेल्या प्रवेशानंतर अगदी जळगाव जिल्ह्यातील भाजप कार्यालये ओस पडली आहेत. ठिकठिकाणी भाजप कार्यकर्ते राष्ट्रवादीत प्रवेश करत आहेत. अशातच आज जळगावात भाजपच्या ६० पदाधिकाऱ्यांनी खडसे यांच्या उपस्थितीत हातावर ‘घड्याळ’ बांधलं. यावेळी बोलताना खडसे यांनी भाजपविरोधात गर्जना केली आहे.  

‘आता मी भाजपला ताकद दाखवून देतो. उत्तर महाराष्ट्रात आता फक्त राष्ट्रवादी काँग्रेसच असेल’, असे म्हणत खडसेंनी भाजपविरुद्ध यल्गार पुकारला आहे. दरम्यान त्यांच्याच जिल्ह्यातील भाजप नेते गिरीश महाजन यांनी खडसे यांनी केलेल्या पक्षांतरानंतर ‘खडसे गेल्यानेकोणताही फरक पडणार नाही’, असे म्हणत खडसेंना डिवचले होते. याच टीकेला प्रत्युत्तर देताना खडसे म्हणाले की, ‘कुणाच्या पाठीमागे किती लोक उभे आहेत हे लवकरच समजेल’.

दरम्यान आज भाजपच्या 60 पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी रोहिणी खडसे – खेवलकर यांच्या मुक्ताईनगर येथील निवासस्थानी हातावर घड्याळ बांधत भाजपला सोडचिठ्ठी दिली. या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमानंतर एकनाथ खडसे यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. खडसेंपाठोपाठ त्यांचे अनेक समर्थक राष्ट्रवादीत येत असल्याने जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पदाधिकारी व कार्यकर्त्यांची इनकमिंग सुरू झाली आहे.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here